‘टीईटी’ घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी, दोषींवर कठोर कारवाई होणार-फडणवीस यांची घोषणा

0

नागपूर : अपात्र कंपन्यांना पात्र केल्याने ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (TET Scam in Maharashtra) घोटाळा झाला आहे. कंपन्यांना पात्र ठरविण्याचा निर्णय मंत्रालय स्तरावर झाला असून अपात्र कंपन्यांना पात्र करून घोटाळा कोणी केला किंवा त्याला प्रोत्साहन कोणी दिले, याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत बोलताना दिली. यासंदर्भात विरोधकांकडून सुरु असलेली टिका तसेच सदस्य संजय कुटे यांनी विचारलेल्या माहितीवर उत्तर देताना फडणवीस यांनी ही घोषणा केली.


विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले की, टीईटी घोटाळा का झाला तर अपात्र कंपन्यांना पात्र केल्याने हा घोटाळा झाला आहे. खरे तर हा घोटाळा कोणाच्या काळात झाला, तेव्हाचे सरकार काय करत होते असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात. राज्यातील लाखो तरुणांना बुडविणारा, त्यांची स्वप्न धुळीस मिळविणारा हा घोटाळा आहे. सनदी अधिकाऱ्यांपासून अनेक जण त्यात लिप्त होते. घोटाळ्याचे तार मंत्रालयापर्यंत पोहोचले आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप केले जात आहेत. प्रत्यक्षात त्यांच्या मुलींना या घोटाळ्यात नोकरी मिळाले नाही. यासंदर्भात स्वतः आयुक्तांनी देखील खुलासा केलेला आहे. मात्र, बेछूट आरोप करून मग निघून जायचे, अशी नवी पद्धत या राज्यात सुरु झाली आहे. त्याला आम्हीही तसेच उत्तर देणार आहोत. स्वतःच्या सत्ताकाळातील घोटाळे बाहेर काढणारा हा पहिला विरोधी पक्ष आहे, असे वर्णन करताना तुम्ही बॉम्ब म्हणता पण तुमच्याकडे साधे लवंगी फटाके देखील नाहीत, अशी कोपरखळीही फडणवीस यांनी विरोधकांना लगावली.