मुंबई-अयोध्येत २२ जानेवारीला होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मिळाले आहे. शरद पवार यांनी निमंत्रणासाठी आभार मानले आहेत. “२२ जानेवारीच्या सोहळ्यानंतर अयोध्येत दर्शनाला नक्की येईल..” जाहीर करीत सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच आपण दर्शनाला येऊ असे पवारांनी या निमित्ताने स्पष्ट केले आहे.
आपल्या धन्यवाद पत्रात पवारांनी नमूद केलेय की, “निमंत्रणासाठी मी खूप आभारी आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम भारतातच नाहीत तर संपूर्ण जगभर पसरलेल्या भक्तांसाठी श्रद्धा आणि आस्थेचे प्रतिक आहेत. अयोध्येतील सोहळ्यासाठी रामभक्तांमध्ये उत्सुकता आणि आतुरता आहेत. अनेक रामभक्त तिथे मोठ्या संख्यने उपस्थित राहतील. त्यांच्या माध्यमातून या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद माझ्यापर्यंत पोहोचेल. २२ जानेवारीच्या सोहळ्यानंतर मला श्रीरामाचे दर्शन सहज आणि आरामदायी घेता येईल. माझा अयोध्येत येण्याचा कार्यक्रम निश्चित आहे. मी येईन तेव्हा श्रद्धापूर्वक रामाचं दर्शन घेईन. तोवर राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेले असेल. तुमच्या स्नेहपूर्ण निमंत्रणासाठी मी पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानतो. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छांचा स्वीकार करा.”
दरम्यान, काँग्रेसने यापूर्वीच हा भाजपचा कार्यक्रम असल्याचे सांगत निमंत्रण धुडकावून लावले आहे. पवारांनी मात्र आपल्या नकारातून तसा संदेश जाणार नाही, अशी काळजी घेतली आहे.