
लखनौ-अयोध्येत २२ जानेवारीला नव्या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला वादाची किनार लाभली आहे. चारही शंकराचार्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रथमच शंकराचार्यांना सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. “राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात शंकराचार्यांनी सहभागी झालं पाहिजे. हा क्षण श्रेयवादाचा किंवा मान-अपमानाचा नाही. प्रभू रामचंद्रांपेक्षा मोठं कुणीही नाही. प्रत्येक माणसाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. त्यानुसार शंकराचार्यांनी त्यांचे म्हणणे मांडले आहे. त्यांनी ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नये. त्यांनी जरुर या सोहळ्याला उपस्थित राहिले पाहिजे”, असे आदित्यनाथ म्हणाले.
“मी असेन, देशाचा सामान्य नागरिक असेल किंवा शंकराचार्य कुणीही रामापेक्षा मोठे नाहीत. प्रभू रामचंद्रांपेक्षा मोठे कुणीही नाही”, असेही ते म्हणाले.
दरम्यान, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी आम्ही कुठल्याही आमंत्रणाला नकार दिलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. आम्हाला अजून आमंत्रणच मिळालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण आम्ही धुडकावले, हा आरोप आमच्यावर होऊ शकत नाही. राम मंदिर ट्रस्टने आम्हाला निमंत्रण का दिले नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. इतर तीन पीठांना आमंत्रण मिळाले आहे की नाही, हे मला ठाऊक नाही. आम्हाला आमंत्रण मिळावे, अशी अपेक्षा आम्ही करत नाही. आम्हाला आमंत्रण मिळाले तरीही आम्ही त्या सोहळ्याला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.