
वर्धा- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाने राज्यव्यापी धरणे आंदोलन केले आहे. नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांवर कोसळत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारने निर्यातबंदी, साठ्यांवर मर्यादा, आयात शुल्क कमी करून बेसुमार आयातीचे निर्णय घेऊन सर्वच शेतीमालाचे भाव पाडले आहे. परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याऐवजी सरकार भीक दिल्यासारखे किरकोळ कर्जमाफी देत आहे.
शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, परंतु कोणत्याही पक्षाने या समस्या सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले नाही. शेतीसाठी वीज पुरवठा, पीक विमा, प्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान व इतर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. मधुसूदन हरणे, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष यांनी नेतृत्व केले.