
नागपूर- अयोध्येत येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. यानिमित्ताने सर्वांनाच अयोध्येला जाण्याची इच्छा आहे. हेच स्वप्न असलेल्या नागपूरच्या सुप्रसिद्ध भजन गायिका भाग्यश्री आणि धनश्री वाटकर या जुळ्या बहिणींना राम मंदिरात जाण्याचा बहुमान मिळाला आहे. त्या दोघी अयोध्येत राम भजन सादर करीत आपला परफॉर्मन्स सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष उपस्थितीत नागपुरातील या भगिनी प्रसिद्ध पार्श्वगायिका लतादीदींनी गायिलेले श्री राम चंद्र कृपालु .., ठुमक चलत रामचंद्र..अशी एकापेक्षा एक सरस भजन सादर करणार आहेत. या बहिणींनी या आधीही राममंदिर भूमिपूजन कार्यक्रमात, दीपोत्सवात भजन सादर केले असून, आता पुन्हा एकदा त्यांना उत्तर प्रदेश सरकारकडून अयोध्येचे निमंत्रण मिळाल्याने त्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात भजन सादर करणार आहेत.