भारतीय संस्कृतीतील आहाराचा आग्रह धर – कांचन गडकरी यांचे महिला डॉक्टरांना आवाह

0

– ‘शक्ती मेडिकॉन’ परिषदेचे उद्घाटन

नागपूर (NAGPUR) : नव्या पिढीच्या आरोग्य समृद्धीसाठी आहार अतिशय महत्वाचा आहे, त्यामुळे महिला डॉक्टरांकडे येणार्‍या रुग्‍णांना त्यांनी भारतीय संस्कृतीतील आहाराचा आग्रह धरावा, असे कळकळीचे आवाहन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांनी केले.

ग्रुप ऑफ फिमेल फिजियन ऑफ नागपूर तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ‘वैद्यकीय क्षेत्रातील महिला’ या संकल्पनेवर आधारित ‘शक्ती मेडिकॉन’ या मध्‍य भारतातील द्विदिवसीय परिषद 8 व 9 मार्च दरम्‍यान हॉटेल तुली इम्पिरीयल येथे आयोजन करण्‍यात आले होते. रविवारी या परिषदेचे उद्घाटन कांचन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. व्‍यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सियान इंडस्ट्रीजच्या अध्यक्ष मधुरा गडकरी तसेच, शक्ती मेडिकॉनच्या संयोजन अध्यक्ष डॉ. आरती धारस्कर, उपाध्‍यक्ष डॉ. विम्मी गोयल आणि सचिव डॉ. श्रुती मिसाळ यांची उपस्थित होती.

कांचन गडकरी यांनी बदलत्या शैलीमुळे मुलांना आहाराविषयी मार्गदर्शन करण्याची गरज असल्‍याचे सांगितले. डॉक्टरांवर लोकांचा प्रचंड विश्वास असतो, आणि महिला डॉक्टर्स तर मातेसमान असतात. महिला डॉक्‍टरांनी महिलांना भारतीय परंपरा, संस्‍कृती जपण्‍याचा आग्रह धरावा, असे त्‍या म्‍हणाल्‍या.

महिला डॉक्टरांनी अशा परिषदांच्‍या आयोजनामध्‍ये न अडकता समाजात म‍िसळावे व ज्या भागात आरोग्याच्या संधी फारश्या नाहीत अशा ठिकाणी जाऊन महिला व बालकांना आरोग्याविषयी माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन मधुरा गडकरी यांनी केले.

डॉ. आरती धारस्कर यांनी प्रास्ताविकातून महिलांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामांची माहिती दिली, तसेच शक्ती मेडिकॉनच्या स्थापनेविषयी माहिती दिली. यावेळी कांचन गडकरी व मधुरा गडकरी यांचा विशेष सत्कार डॉ. आरती धारस्कर व डॉ. विम्मी गोयल यांच्या तसेच, डॉ. पूजा जाधव, डॉ. मिताली पद्मावार, डॉ. शिल्पा परांजपे, डॉ. स्वप्ना खानझोडे, डॉ. मोनाली साहू, डॉ. राधा मुंजे, डॉ. राजश्री खोत, डॉ. विम्मी गोयल व डॉ. आरती धारस्कर, डॉ. श्रुती निसाळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संचालन व आभारप्रदर्शन डॉ. श्रुती निसाळ यांनी केले.

या दोन दिवसीय परिषदेत डॉ. राधा मुंजे, डॉ. अनिता खंडेलवाल, डॉ. मोनाली साहू, डॉ. शिल्‍पा देवके व डॉ. प्रियंका कुकरेले, डॉ. विम्‍मी गोयल, डॉ. शिवानी स्वामी, डॉ. रिया बल्लीकर, डॉ. शायली चांडक, डॉ. देवप्रिया लाकरा व डॉ. राजश्री खोत यांचे विविध विषयांवर सत्र पार पडले. तसेच, पेपर व पोस्‍टर प्रेझेंटेशनच्‍या सत्रात डॉ. मोनिका मालोकर, डॉ. देवयानी बुचे, डॉ. जयश्री शेंबालकर, शिवाली धारस्‍कर व डॉ. कोमल पवार यांचा सहभाग होता. डॉ. स्‍वप्‍ना खानझोडे यांचे मेडिकल क्विज तसेच, संगीत, नृत्याचा सांस्कृतिक कार्यक्रमदेखील पार पडला.