भाजयुमोचे आंदोलन,कुणाल राऊत विरोधात गुन्हा दाखल

0

नागपूर – प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी विद्यापीठ परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा जाळून अवमान केल्याप्रकरणी अंबाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज भाजयुमोने विद्यापीठात घोषणाबाजीसह आंदोलन केले. १ फेब्रुवारी रोजी कुणाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रातुम विद्यापीठ परिसरात स्वातंत्रवीर सावरकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता.

हा पुतळा जाळण्यापूर्वी कुलगुरू डाॅ. सुभाष चौधरी यांच्या दालनात जाऊन राऊत यांच्यासह १५ ते २० पदाधिकाऱ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात घोषणाबाजीही केली होती. त्यांना बुधवारला जामीन मंजूर झाला.आज पुन्हा त्यांच्यावर विद्यापीठ प्रकरणी गुन्हा दाखल झाला. कारवाई होत नसल्याने भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी संतापून विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेची बैठक उधळून लावली.

भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात ‘जय श्रीराम’चे नारे लावत चांगलाच गोंधळ घातला. यावेळी कुणाल राऊत यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत ठिय्या आंदोलन पुकारले. भाजपचे शहर पदाधिकारी विष्णू चांगदे आणि भाजयुमोच्या शिवानी दाणी यांच्यासह घोषणा देत कार्यकर्ते सभागृहात शिरले. कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांनी बैठक काही वेळ स्थगित केली.