अखेर पालकमंत्र्यांची घोषणा; बघा कोणाकडे कोणता जिल्हा

0

देवेंद्र फडणवीस – गडचिरोली, एकनाथ शिंदे मुंबई, अजित पवार- बीड, बावनकुळे – नागपूर 

मुंबई: सरकार स्थापन होऊन तब्बल एक महिना राखडलेली पालकमंत्र्यांची बहुप्रतिक्षित घोषणा अखेर शनिवारी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई व ठाणे, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे व सध्या सर्वार्थाने चर्चेत असलेले बीड, चंद्रशेखर बावनकुळे नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रिपद असणार आहे.

बीड प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले धनंजय मुंडे यांना पालकमंत्र्यांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. तर राज्यात प्रथमच सह पालकमंत्र्यांची संकल्पनाही अंमलात आली आहे. राज्यमंत्री. आशीष जयस्वाल हे गडचिरोलीचे, मंगलप्रभात लोढा हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे, तर माधुरी मिसाळ या कोल्हापूरच्या सह पालकमंत्री असणार आहेत.

महायुती सरकारमधील तीनही घटक पक्षातील नेत्यांच्या आपसांत गहन चर्चेनंतर राज्यातील सर्व पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पुढील काळातील प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या गरजेच्या देखील होत्याच.

 

मुंबई: महायुती सरकारने अखेर राज्यातील ३७ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी घोषित केली आहे. या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपेक्षेप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहराचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पालकमंत्र्यांच्या यादीतील सर्वात महत्वाची बाब म्हणजे, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा पालकमंत्रीपदाच्या यादीतून पत्ता कट करण्यात आला आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदापासून मुंडे यांना वगळून खुद्द अजित पवार यांनी ही जबाबदारी आपल्याकडे घेतली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बावनकुळे यांच्याकडे अमरावती जिल्ह्याचेही पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. विदर्भातील वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी हसन मुश्रीफ यांची तर यवतमाळच्या पालकमंत्रीपदी संजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. अशोक ऊईके – चंद्रपूर, संजय सावकारे – भंडारा, आकाश फुंडकर – अकोला, मकरंद जाधव पाटील – बुलढाणा, बाबासाहेब पाटील – गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहेत.