महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग धोरण सर्वोत्तम – वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे

0

‘अॅडव्‍हांटेज विदर्भ – 2025’ मध्‍ये ‘वस्‍त्रोद्योगासाठी विदर्भ आदर्श ठिकाण’ विषयावर चर्चासत्र
नागपूर (Nagpur) : वस्त्रोद्योग वाढविण्याकरिता आतापर्यंत सरकारने अनेक पॉलिसी तयार केल्या. यात महाराष्ट्राचे धोरण देशात सर्वोत्तम आहे. त्यामुळे राज्यांचे उद्योजकही याकडे आकर्षित होऊन गुंतवणूक करीत आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले.

असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंटच्‍यावतीने आयोजित ‘अॅडव्‍हांटेज विदर्भ – 2025 : खासदार औद्योगिक महोत्सव’ च्‍या उद्घाटनाचे दिवशी वस्‍त्रोद्योग क्षेत्रासाठी आयोजित ‘विदर्भ अॅज अॅन आयडियल डेस्‍टीनेशन फॉर अपॅरल युनिट्स अँड टेक्निकल टेक्‍टाईल्‍स’ विषयावर आयोजित परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर गीमाटेक्स इंडस्ट्रीजचे संचालक प्रशांत मोहता, पीआरएन टेकटेक्सचे योगेश नावंदर, सुवीन टेक्निकल टेक्‍टाईलचे प्रबंध संचालन अविनाश मायेकर, इंडोरामाच्या उपमहाप्रबंधक दीपाली वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते

संजय सावकरे म्हणाले, गडकरींनी भारताला एक नवी दिशा दिली. पूर्वी टेक्सटाईलकडे सरकारचे विशेष लक्ष नव्हते. आता स्पर्धा वाढली आहे. पण सर्वांच्या मदतीने वस्त्रोद्योगात नक्कीच प्रगती होईल, सरकारने याकरिता योजना तयार केल्या. यात महाराष्ट्राची पॉलिसी ही पूर्ण देशात चांगली आहे. त्यामुळे गुजरातचे उद्योजकही यात सहभागी होत आहेत. विदर्भात सगळ्यात चांगल्या प्रतीचे कापड तयार होते. सर्व युनिट एकत्र करून पॉलिसी तयार कररण्‍याचा सरकारचा प्रयत्‍न असून त्‍याचा सर्वांना लाभ होईल.

अमरावतीमध्ये वस्त्रोद्योगाबाबत चांगले सेक्टर निर्माण झाले आहे. महाराष्ट्र सरकारने टेक्सटाईल पॉलिसी बनवली असून मिनी टेक्सटाईल पार्क हे युनिट फायदेशीर ठरू शकते. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठे योगदान देणा-या 5 क्षेत्रांपैकी वस्त्रोद्योग एक असून आपल्या पारंपारिक वस्त्रांचे प्रदर्शन व्हावे आणि त्यातून त्याची विक्री वाढावी हा उद्देश असल्‍याचे ते म्‍हणाले. उद्योजकांच्या काही अडचणी दूर करण्याची प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी प्रशांत महासागर यांनी, प्रास्ताविकातून महाराष्ट्रात वस्त्रोद्यागात ज्या अडचणी होत्या त्या आता बर्‍याच प्रमाणात दूर झाल्या असल्‍याचे सांगितले. महाराष्ट्र सरकारच्या पॉलिसी कन्सल्टंट कामाक्षी वर्मा यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारा टेक्सटाईल पॉलिसीची माहिती दिली. दीपाली वानखेडे यांनीही आपल्या योजनांबाबत माहिती दिली. चर्चासत्राचे संचालन व आभारप्रदर्शन डॉ. रिचा सुगंध यांनी केले. यावेळी वस्त्रोद्योग क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.