
नागपूर (Nagpur) : 14 जानेवारी
मराठी भाषा महाराष्ट्रीयन लोकांचा अस्मितेचा केंद्रबिंदू आहे, त्यात संस्कार आणि संस्कृती यांचा मिलाप आहे. अतिशय प्राचीन भाषा आहे. ती मुळात ज्ञानभाषा आहेच पण तिला सर्वसमावेशक स्थान देण्याची इच्छा असल्यास तिला व्यवसायाभिमुख व्हावे लागेल असे आवाहन अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी केले.
नूतन भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विदर्भ साहित्य संघ, नागपूर महानगरपालिका शिक्षण विभाग नागपूर आणि कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलन स्थानिक सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आले. या तीन दिवसीय संमेलनाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना ते बोलत होते.
मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलनाचा समारोप
याप्रसंगी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव चिंतामण वंजारी, ज्येष्ठ लेखक प्रकाश एदलाबादकर, शिक्षण उपसंचालक डॉ. उल्हास नरड, डॉ. प्रदीप बिबटे, अनिल गोतमारे, सपन नेहरोत्रा, संयोजन अध्यक्ष रवींद्र काटोलकर, कार्यकारी अध्यक्ष रमेश बक्षी, सहसंयोजक संध्या महाजन, संयोजन सचिव डॉ. वंदना बडवाईक आदी मान्यवरांसह प्रा. सुनील डिसले, प्रा. संजय तिजारे, प्रा. सुरेश नखाते, कवयित्री मनीषा रिठे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ. रवींद्र शोभणे यांनी, बहुतांश साहित्य संमेलनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग असतो, त्याठिकाणी तरुण शोधावे लागतात. पण या संमेलनात विद्यार्थी, शिक्षक आणि तरुण मराठी प्रेमी दिसत आहेत. त्यामुळे हे संमेलन तरुण असल्याचे सांगितले. आता मराठीला अभिजात दर्जा मिळाला आहे, भाषेच्या विकासाचा निधी देखील येणार असून त्यासाठी सर्वांनी तयारी करावी मराठीच्या जोपासनेसाठी प्रत्येकाने प्रयत्न करुन योगदान द्यावे असे आवाहन केले.
डॉ. रवींद्र शोभणे यांचे आवाहन
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. प्रारंभी डॉ. वंदना बडवाईक यांनी, नव्या पिढीला मराठी जाणता यावे यासाठी हे संमेलन आहे, सध्या मराठी शाळांपुढे अडचणी आहेत. त्यातून पुढे जाण्यासाठी आम्ही मराठी ही चळवळ उभी झाली असल्याचे सांगितले.
यावेळी शिक्षण उपसंचालक डॉ. उल्हास नरड यांनी मनोगतातून, या पहिल्या उपक्रमाची शासनाने दखल घेतली आहे, मराठी आज संकटात असेल तर ती शहरात आहे, ग्रामीण भागात मराठीला सन्मान आहे, त्यासाठी प्रत्येकांना घरापासून प्रारंभ करण्याची गरज असल्याचे सांगितले. यासोबतच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे सचिव चिंतामण वंजारी यांनी, मराठी भाषेची चळवळ राबवायची असल्यास वर्ष 3 ते 14 या वगोगटातील मुलांना मराठीतून शिक्षण देण्याची गरज असल्याचे सांगितले. संमेलनाच्या समारोपानिमित्त संमेलनाच्या आयोजनात सहभागींना विविध गटात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. माझी शाळा उपक्रमाचा निकाल डॉ. उज्ज्वला अंधारे यांनी घोषित केला व अवलोकनादरम्यान आलेले अनुभव कथन केले. संचालन डॉ. मानसी कोलते यांनी केले. तर आभारप्रदर्शन रमेश बक्षी व डॉ. वंदना बडवाईक यांनी मानले.चौकट
तीन ठराव पारित
या संमेलनाच्या निमित्ताने पारित एकूण तीन प्रस्तावांचे वाचन रवींद्र काटोलकर यांनी केले. त्यात मराठी ज्ञानभाषा व्हावी यासाठी ‘आम्ही मराठी ही चळवळ राबविण्यासाठी कटिबद्ध आहोत, महाराष्ट्रात विद्यार्थ्यांचे वय 3 ते 14 या दरम्यानचे संपूर्ण शिक्षण मराठीतूनच व्हावे, वरील दोन्ही ठराव आगामी अ. भा. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना सुपूर्द करण्यासाठी आम्ही मराठीचे एक शिष्टमंडळ दिल्ली येथे जाऊन निवेदन देणार असल्याचे सांगण्यात आले.