
नाशिक – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) विद्यार्थ्यांकडून दीक्षांत समारंभासाठी अवास्तव कॉन्व्होकेशन फी वसूल केली जात असल्याचा आरोप यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक माजी विद्वत परिषद सदस्य, प्रा. डॉ. संजय त्रिंबकराव खडक्कार यांनी केला आहे. विद्यार्थ्यांकडून प्रति व्यक्ती ४५० रुपये आकारले जात असून, त्यातून विद्यापीठाने वर्षभरात ५ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळवला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
प्रा. खडक्कार यांनी महाराष्ट्र राज्यपालांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “विद्यापीठ हा शैक्षणिक उपक्रम असून, नफा मिळवणे हे त्याचे उद्दिष्ट नाही. तरीही दीक्षांत समारंभातून विद्यापीठ मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहे. या फीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर अनावश्यक आर्थिक भार टाकला जात आहे, जे मुक्त शिक्षणाच्या संकल्पनेला विरोधाभासी आहे.”
मागील दोन वर्षांपासून, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ शैक्षणिक शुल्क(फी )वाढवत आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून कॉन्व्होकेशन फी रुपये ४५० आकारत आहे, जी महाराष्ट्रातील इतर सार्वजनिक विद्यापीठांपेक्षा सर्वात जास्त आहे .अंतीम वर्षात प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांकडून ही कॉन्व्होकेशन फी घेण्यात येते. दरवर्षी ही विद्यार्थी संख्या सरासरी १.२५ लाखापेक्षा जास्त असते. अशाप्रकारे कमीतकमी १,२५,०००x रु.४५० = ५ कोटी,६२ लाख,५०० रुपये, दीक्षांत समारंभासाठी विद्यार्थ्यांकडून जमा केले जातात. यात दीक्षांत समारंभात विद्यापीठाला जास्तीत जास्त अंदाजे,२५ लाख रुपये कार्यक्रम खर्च व सर्टिफिकेट प्रिंटिंग १५ लाख रुपये,असे एकूण ४० लाख रुपये खर्च होतो. त्यामुळे विद्यापीठ फक्त दीक्षांत समारंभ आयोजित करून *५ कोटींहून अधिक रुपयांचा नफा कमावते.
याशिवाय, दीक्षांत प्रमाणपत्राच्या दुरुस्ती किंवा डुप्लिकेट प्रमाणपत्रासाठी ६०० रुपये आकारणे हेही अत्याधिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडे १,००० कोटींहून अधिक रक्कम बँक ठेवीच्या स्वरूपात असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या या वसुलीवर त्वरित कारवाई करण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे. विद्यापीठाने ही लूट थांबवावी आणि विद्यार्थ्यांवरील आर्थिक अन्याय दूर करावा, अशी विनंती प्रा. खडक्कार यांन केली आहे.