मुंबई :स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा 28 मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Swatantryaveer Gaurav Divas) यांनी मंगळवारी केली. गौरव दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी राज्यात कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यासंदर्भात राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी मागणी केली होती. ही घोषणा करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रोन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती, धैर्य, प्रगतीशील विचारांना पुढे नेण्यासाठी, त्यामाध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती. त्यानूसार शासनाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा 28 मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
अलिकडेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून वाद झाला होता. त्यानंतर काँग्रेसला उत्तर देण्यासाठी भाजप व शिवसेनेच्या वतीने राज्यात सावरकर गौरव यात्रांचे आयोजन झाले. तर दुसरीकडे सावरकरांवर टीकेवरून महाविकास आघाडीत मोठे मतभेद निर्माण झाले आहेत. ठाकरे गटाने राहुल गांधींच्या वक्तव्यावर आक्षेप घेत वाद टाळण्याचे आवाहन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही विरोधकांच्या बैठकीत सावरकर विषयावर बोलणे टाळण्याचा अप्रत्यक्ष सल्ला राहुल गांधी यांना दिला होता. त्यावर राहुल गांधी यांनी यापुढे सावरकर विषय टाळणार असल्याचे बैठकीत सांगितल्याचे समजते. दरम्यान, अद्यापही काँग्रेसचे नेते सावरकर विषयावर बोलताना आढळून येत आहेत.