पुणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. पुण्यातील वारजे या परिसरातून हा धमकीचा फोन आल्याचे उघड झाले आहे. एका व्यक्तीने दारुच्या नशेत हा फोन केल्याचे उघड झाले आहे. सोमवारी रात्री ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर हा फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने “मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे” या शब्दात धमकी देऊन कॉल बंद केला होता. (CM Eknath Shinde Threat Call) या कॉलनंतर पोलिसांनी तातडीने कॉलचा शोध घेतला असता धमकीचा कॉल पुण्यातील वारजे येथून आल्याचे आढळून आले. कॉल करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशीही केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉल करणारा व्यक्ती दारुच्या नशेत होता. त्याने सुरुवातीला छातीत दुखत असल्याचे सांगत रुग्णवाहिकेसाठी कॉल केला. पण, रुग्णवाहिकेचे नियंत्रण कक्षाने त्याला १०८ क्रमांकावर कॉल करण्याची सूचना केली होती. मात्र, त्याने ११२ क्रमांक डायल करून थेट मुख्यमंत्री शिंदे यांना उडविण्याची धमकी दिली. या व्यक्तीची कौटुंबिक पार्श्वभूमीही पोलिसांनी जाणून घेतली. तो मुंबईत रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करतो. त्याची पत्नी कोथरुडला खाजगी ठिकाणी काम करते. तिला भेटायला तो महिन्यातून दोन वेळा येतो. तो दारूच्या नशेत कोणालाही शिवीगाळ करतो, अशी माहिती त्याची पत्नी व नातेवाईकांनी दिली. नागपुरातही यापूर्वी अशा पद्धतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमक्यांचे कॉल आले आहेत. दारुच्या नशेत असे कॉल केल्याच्या काही घटना मागील तीन चार महिन्यात नागपुरात घडल्या आहेत.