मुंबई : अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या समूहातील कथित ‘बेनामी कंपन्यांकडून’ मिळालेल्या २० हजार कोटी रुपयांचा हिशेब मागणारा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. या प्रश्नाला आता खुद्द अदानी समूहाने उत्तर दिले आहे. अदानी समूहाच्या स्पष्टीकरणानुसार, २०१९ पासून समूहातील कंपन्या सातत्याने त्यांचे भागभाडंवल विकत असून यातून उपलब्ध झालेल्या २.८७ बिलियन डॉलर म्हणजेच सुमारे २३,५०० कोटी रुपयांच्या रकमेपैकी सुमारे २०,९०० कोटी रुपये व्यवसाय विस्तारासाठी पुन्हा गुंतवण्यात आल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. अदानी समूहाने गेल्या चार वर्षांचा संपूर्ण लेखाजोखा सोमवारी सार्वजनिक केला. समूहाला नष्ट करण्यासाठी स्पर्धा सुरु असल्याचे देखील समूहाने म्हटले आहे.
अबुधाबी येथील इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी पीजेएससीने समूह कंपन्यांमध्ये 2.593 अब्ज डॉलर (रु. 21,255 कोटी) गुंतवणूक केली. ही गुंतवणूक अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड आणि अदानी एनर्जी लिमिटेड (AGEL) मध्ये करण्यात आली असून अदानी टोटल गॅस लिमिटेड आणि AGEL मधील हिस्सेदारी विकून गुंतवणूकदारांनी 2.783 अब्ज डॉलर (सुमारे 22812 कोटी रुपये) उभे केले. हा पैसा अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये पुन्हा गुंतवण्यात आला, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, अदानी समूहाच्या स्पष्टीकरणानंतर काँग्रेस काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे. काँग्रेसकडून सातत्याने अदानी समूहाला लक्ष्य केले जात आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने अदानी समूहाची पाठराखण केली आहे.