राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळवू, जयंत पाटील यांना विश्वास

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यावर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली असून आम्ही पुन्हा हा दर्जा मिळवू, असा विश्वास व्यक्त (We will regain status of national Party) केला आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यावर निवडणूक चिन्ह घड्याळ पक्षाकडे कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. जयंत पाटील म्हणाले की, आमच्या पक्षाच्या चिन्हाला धक्का लागेल, असे वाटत नाही. घड्याळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह कायम राहील. याबाबत माझ्या मनात शंका नाही. महाराष्ट्रापुरता हा विषय पाहिल्यास या चिन्हाला कोणताही धक्का लागणार नाही, असे दिसते. स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा याची आम्हाला चिंता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही राज्यातील निवडणुकानंतर आमची परिस्थिती सुधारेल व पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवू ,असा, विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादी काँग्रेस व तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला. तर आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल करण्यात आलाय. या राजकीय पक्षांची कामगिरी लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यासंदर्भात बोलताना म्हणाले की, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कोणत्या पक्षाकडे राहू शकतो, याचे काही निकष आहेत. गेल्या दोन वर्षात याबाबत सुनावणी झाली. यात आम्ही आमची बाजू मांडली होती. परंतु, आता निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. या देशातील कोणते पक्ष राष्ट्रीय पक्ष राहू शकतात, याविषयीच्या निकषात प्रत्येक निवडणुकीत काही बदल होत असतात. आगामी काही राज्यांच्या निवडणुकांमध्ये आमची कामगिरी समाधानकारक झाली तर हा दर्जा पुन्हा मिळू शकतो. त्यात मला फार अडचण वाटत नाही, असे पाटील म्हणाले.