सात जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान ६५ क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सातव्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा बुधवारी (ता.१) ला करण्यात आली. रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहामध्ये सातव्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा केल्यानंतर गडकरींच्या हस्ते क्रीडा संघटनांना ध्वज वितरित करण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात गडकरी यांनी ७ जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंत क्रीडा महोत्सवचालणार असल्याची घोषणा केली.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महसूल मंत्रीचंद्रशेखर बावनकुळे आणि विशेष अतिथी म्हणून भारतीय पॅरा ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष पद्मश्री देवेंद्र झांझरिया उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले की, विशेष म्हणजे या सोहळ्यात देशाचा अभिमान असलेले पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंचा विशेष सन्मान अतिथींच्या हस्ते करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या खेळाडूंचा विशेष सन्मान देशात दुसऱ्यांदा होत आहे. बॅडमिंटन पुरुष एकेरीत सुवर्ण पदक विजेता नितेश कुमार, ऍथलेटिक्स भाला फेक मध्ये सुवर्ण पदक विजेता सुमित अंतिल, तिरंदाजी वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक विजेता हरविंदर सिंग, ऍथलेटिक्स क्लब थ्रो मध्ये सुवर्ण पदक विजेता धरमबीर नैन, ऍथलेटिक्स उंच उडीमध्ये सुवर्ण पदक विजेता प्रवीण कुमार, ऍथलेटिक्स भाला फेक मध्ये सुवर्ण पदक विजेता नवदीप सिंग, महिला गटात १० मीटर एअर रायफल शुटिंगमध्ये सुवर्ण पदक विजेती अवनी लेखारा या खेळाडूंनी पॅरा ऑलिम्पिकमध्ये आपल्या कामगिरीने जगात संपूर्ण देशाचे नावलौकिक केले आहे. या सर्व खेळाडूंना खासदार क्रीडा महोत्सव समितीद्वारे नितीन गडकरी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
क्रीडा प्रेमींसाठी पर्वणी : संदीप जोशी
आमचे मार्गदर्शक नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात हा महोत्सव पार पडणार आहे. क्रीडा महोत्सवाला दरवर्षी प्रतिसाद वाढत आहे. महोत्सव मोठा असल्याने निश्चितच मोठी मेहनत घ्यावी लागते. महोत्सवाला येणारे खेळाडू, क्रीडा संघटक, पंचांची सर्व व्यवस्था केली जाणार आहे. सध्या विदर्भस्तरीय महोत्सव असला तरी भविष्यात राज्यस्तरावर करण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी माहिती क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी यांनी यावेळी दिली.