

नागपूर[Nagpur], दि. १७ जून २०२५: ‘काम कोणतंही असो, दिव्यांगत्व आड येणार नाही!’ हा संदेश महावितरण कंपनीने आपल्या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. कंपनीने आपल्या दिव्यांग (अस्थिव्यंग) कर्मचाऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. कंपनीच्या धोरणानुसार, मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते नागपूर परिमंडलातील तीन दिव्यांग कर्मचाऱ्यांना नुकतेच स्वयंचलित तीन चाकी वाहनांचे वाटप करण्यात आले. यामुळे या कर्मचाऱ्यांचा कार्यप्रवाह अधिक गतिमान होणार असून, त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.
या प्रसंगी, नागपूर शहर मंडल येथील उपव्यवस्थापक (वित्त व लेखा) महेश ताजणे, कॉग्रेसनगर विभागातील उच्चस्तर लिपीक (मानव संसाधन) संजय भोसकर आणि उमरेड विभागातील यंत्रचालक अब्दुल नईम अ. अजिज शेख यांना मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते या विशेष वाहनांच्या चाव्या आणि कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली. हे क्षण केवळ या तिघांसाठीच नव्हे, तर उपस्थित असलेल्या प्रत्येकासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी होते.
यावेळी अधीक्षक अभियंता अमित परांजपे आणि संजय वाकडे यांच्यासह महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अतुला राऊत, कार्यकारी अभियंता विजय तिवारी, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश जाधव, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर, वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन) विवेक बामन्होटे यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महावितरणच्या या उपक्रमामुळे केवळ आपल्या कर्मचाऱ्यांप्रती संवेदनशीलताच दर्शविली गेली नाही, तर त्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी कंपनी किती कटिबद्ध आहे, याची ग्वाही देखील दिली आहे. ही स्वयंचलित तीन चाकी वाहने आता या कर्मचाऱ्यांसाठी केवळ प्रवासाचे साधन नसून, त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारे आणि कार्यक्षमतेला गती देणारे माध्यम बनले आहे.
या वाहनांच्या मदतीने, हे कर्मचारी आता आपल्या कार्यालयात आणि कार्यक्षेत्रात अधिक सहजपणे व आत्मविश्वासाने पोहोचू शकतील. हा निर्णय केवळ त्यांच्या वैयक्तिक जीवनातच नव्हे, तर त्यांच्या व्यावसायिक प्रगतीतही एक मोठा आधार ठरणार आहे. महावितरणच्या या सकारात्मक दृष्टिकोनामुळे समाजात दिव्यांग व्यक्तींप्रती अधिक आदराची आणि सन्मानाची भावना निर्माण होईल, अशी आशा याप्रसंगी व्यक्त करण्यात आली. हे पाऊल इतर संस्थांसाठीही एक आदर्श ठरू शकते.
फ़ोटो ओळ – दिव्यांग कर्मचा-यांना विशेष वाहनांच्या चाव्या आणि कागदपत्रे सुपूर्द केल्यानंतर मुख्य अभियंता दिलीप दोदके सोबत इतर अधिकारी
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर