Home Artical Blog विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप नको!

विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप नको!

0

गडकरींना जोशींचे पत्र

नागपूर (Nagpur) :-
विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या संदर्भात नितीन गडकरी यांनी डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांना लिहिलेल्या पत्रात आपली भूमिका, साहित्य संस्थेच्या संदर्भात राजकारणी, व्यावसायिक आणि साहित्य क्षेत्राबाहेरील लोक यांनी कधीच हस्तक्षेप करू नये, अशी मांडून झाल्यावरही, भाजपचे काही पदाधिकारी हे गिरीश गांधी यांना व ते सांगतील त्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी पक्षाचे आदेश असल्याचे सांगत या निवडणुकीत जो राजकीय हस्तक्षेप करत असल्याच्या ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत, ते त्यांचे वर्तन त्यांच्याच पक्ष व संघटनेच्या प्रतिमेला बाधा आणणारे म्हणून निषेधार्ह असून, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी संबंधितांना समज देत हा प्रकार ताबडतोब थांबवावा आणि तो थांबवला असल्याचे जाहीरही करावे अशी मागणी विदर्भ साहित्य संघ वाचवा समुहातर्फे करण्यात आली आहे.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी हे या समुहाचे विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार देखील आहेत.
त्यांनी नितीन गडकरी यांना नव्याने पत्र लिहून भाजपाचा या निवडणुकीतील हा अवांछित हस्तक्षेप थांबवावा अशी मागणी केली आहे. तुमचा, पर्यायाने तुमच्या पक्षाचा या निवडणुकीशी कोणताही संबंध नसेल, तर तुमच्या व पक्षाच्या नेत्यांच्या वतीने चाललेला हस्तक्षेप जो गेली ४० वर्षे विदर्भ साहित्य संघ चालवताना कधीही आम्हाला जाणवला नाही व तुम्ही तो केला नाही हेच आम्ही त्यामुळे आमच्या गावोगावीच्या भेटीत अजूनही सांगतोच आहोत. साहित्य संस्थेच्या संदर्भात राजकारणी, व्यावसायिक आणि साहित्य क्षेत्राबाहेरील लोक यांनी कधीच हस्तक्षेप करू नये, अशी मला दिलेल्या उत्तरातील तुम्ही मांडलेली नि:संदिग्ध शब्दातील तुमची भूमिका देखील आम्ही गावोगावी सांगतो आहोत.

मात्र सोबतच्या वृत्तातून समोर येत असलेली वस्तुस्थिती तुमच्याच जाहीर भूमिकेला पूर्णपणे छेद देणारी दिसते आहे असे डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी पत्रात म्हटले असून उलट तुमच्या पक्षाचा पर्यायाने तुमचा या निवडणुकीत हस्तक्षेप असल्याचीच प्रतिमा, तुमचीच मंडळी, तुमच्या पक्षाचे लोक ज्या प्रकारे जणू ही निवडणूक जिंकून देण्याची जबाबदारी पक्षानेच
त्यांच्यावर टाकल्याच्या थाटात हस्तक्षेप करत सुटले आहेत, तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचे व संघाचे तसे आदेशच असल्याचे सांगत आहेत, काही पक्ष कार्यकर्ते तर आदेशच गिरीश गांधी व अन्य काही उमेदवारांना निवडून आणण्याचे आहेत असे खुलेपणाने सांगत आहेत. हे सर्व तुमचे आपले संबंध व तुमची आमच्या मनात असणारी प्रतिमा या पार्श्वभूमीवर अतीव क्लेश देणारे आहे, तुमच्या संघटन मंत्र्यांच्या औपचारिक, संबंध नसल्याचे सांगणाऱ्या वक्तव्यावर लहान मूलही विश्वास ठेवू शकणार नाही एवढे मतदार सुशिक्षित निश्चितच आहेत. हे सारे आम्ही आमचे जे स्नेही नितीन गडकरी यांना ओळखतो त्यांच्या व त्यांच्या पक्षाच्या प्रतिमेला बाधा आणणारे आहे हे वेगळे सांगण्याचे कारण नाही. आणि हे सारे एका अवाङ्मयीन, अमराठी, असाहित्यिक, वाङ्मय, वाङ्मयीन चळवळ, विदर्भ साहित्य संघाची उद्दिष्टे, कार्य याचेशी कोणताही संबंध नसणाऱ्या अवाङ्मयीन उमेदवारांच्या ताब्यात विदर्भ साहित्य संघ ही संस्था देण्यासाठी चालले आहे हे तर सर्वाधिक क्लेशदायक आहे.

आम्हा लेखकांच्या संस्था कृपया आम्हाला चालवू द्याव्या, त्या राजकारणी आणि व्यावसायिक, साहित्य क्षेत्राबाहेरील लोक यांच्या अभद्र युतीच्या हातात जाणार नाहीत यासाठी व या मंडळींनी हस्तक्षेप करू नये या तुमच्याच भूमिकेच्या रक्षणाचा जो जीवापाड प्रयत्न आम्ही करतो आहोत त्यासाठी कृपया आपल्या संघटन मंत्र्यांनी जे हस्तक्षेप करणारे प्रयत्न चालवले आहेत ते कृपया आपण त्यांना त्वरित थांबवण्यास सांगावे तसेच या सर्व पार्श्वभूमीवर आपण स्वतः जाहीररित्या यथायोग्य तो खुलासा करावा आणि विदर्भ साहित्य संघ राजकारणी, व्यावसायिक आणि साहित्य क्षेत्राबाहेरील लोक यांच्यापासून वाचवण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती करीत आहोत, असे डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी उमेदवार म्हणूनच नव्हे, तर
प्रमुख संयोजक, मराठीच्या व्यापक हितासाठी, संयोजक, वैश्विक मराठी परिवार, संयोजक,महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी भाषा-संस्कृती परिषद, पूर्वाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि सदस्य,राज्य भाषा सल्लागार समिती या नात्याने मराठीच्या व्यापक हितासाठी पाठवीत असल्याचे म्हटले आहे.