
नागपूर(Nagpur), दि. 19 फेब्रुवारी 2026: वाढत्या महागाईच्या काळात नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील वीज ग्राहकांसाठी महावितरणचे ‘स्मार्ट टीओडी’ (Time of Day) मीटर खऱ्या अर्थाने ‘लक्ष्मी’ ठरत आहेत. गेल्या अवघ्या सात महिन्यांत या अत्याधुनिक मीटरमुळे नागपूर परिमंडलातील घरगुती ग्राहकांनी आपल्या वीज बिलात तब्बल 3 कोटी 11 लाख 95 हजार 452 रुपयांची भरघोस सवलत मिळवली आहे. महावितरणच्या या मोहिमेमुळे दिवसा वीज वापरणे आता ग्राहकांसाठी फायद्याचे ठरत असून, स्मार्ट मीटर आणि सौर ऊर्जेचा प्रभावी वापर हे या यशाचे मुख्य सूत्र बनले आहे.
महावितरणने राबविलेल्या या विशेष योजनेअंतर्गत, सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट 80 पैसे इतकी थेट सवलत दिली जात आहे. जुलै 2025 ते जानेवारी 2026 या सात महिन्यांच्या कालावधीत नागपूर जिल्ह्यातील 2 लाख 81 हजार 288 घरगुती ग्राहकांनी 2 कोटी 79 लाख 3 हजार 397 रुपयांची बचत केली, तर वर्धा जिल्ह्यातील 57 हजार 901 ग्राहकांनी 32 लाख 92 हजार54 रुपयांचा फायदा मिळवला आहे. विशेष म्हणजे, परिमंडलातील सुमारे 5 लाख घरगुती ग्राहकांकडे हे मीटर बसविण्यात आले असून, उर्वरित ग्राहकांनाही त्यांच्या बिलिंग चक्रानुसार लवकरच हा लाभ मिळणार आहे.
या योजनेच्या मुळाशी सौर ऊर्जेचा वाढता वापर आहे. दिवसा उपलब्ध होणारी सौर ऊर्जा इतर पारंपरिक स्त्रोतांच्या तुलनेत स्वस्त असते. या स्वस्त विजेचा थेट लाभ ग्राहकांना मिळावा, या उद्देशाने महावितरणने टीओडी मीटरचा पर्याय समोर आणला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या वीज दर निश्चितीकरण आदेशानुसार सध्या मिळणारी 80 पैशांची ही सवलत नजीकच्या काळात 1 रुपया प्रति युनिटपर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे. मात्र, ही सवलत मिळवण्यासाठी ग्राहकाच्या घरात स्मार्ट टीओडी मीटर असणे तांत्रिकदृष्ट्या अनिवार्य आहे. या मोहिमेत पारदर्शकता जपण्यासाठी महावितरणने स्वतःच्या कार्यालयांतून आणि कर्मचारी वसाहतींमधून या मीटरची यशस्वी सुरुवात केली आहे.
महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे ग्राहक आता आपल्या वीज वापराचा ‘रिअल टाइम’ डेटा पाहू शकतील. दर तासाला, दिवसाला किंवा आठवड्याला किती वीज खर्च झाली, याची माहिती उपलब्ध असल्याने ग्राहकांना आपल्या वीज वापराचे नियोजन करणे आणि वीज बचत करणे सहज शक्य होणार आहे.
दुसरीकडे, काही भागांत स्मार्ट मीटरबाबत जाणीवपूर्वक चुकीचे समज आणि अफवा पसरवून या प्रक्रियेला विरोध दर्शविला जात आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी ग्राहकांना वस्तुस्थिती समजून घेण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, “हे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरण कोणतेही शुल्क आकारत नाही, ही प्रक्रिया पूर्णतः मोफत आहे. या मीटरमुळे बिल वाढत असल्याचा दावा पूर्णतः चुकीचा असून, उलट यामुळे वीज वापराचे अधिक अचूक वाचन ग्राहकांना मिळते.” सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या माहितीला बळी न पडता, जास्तीत जास्त सवलत मिळवण्यासाठी ग्राहकांनी हे मीटर बसवून घेण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर















