
यवतमाळ (Yawtmal) : झारखंड येथील कुख्यात नक्षलवादी तुलसी उर्फ दिलीप महातो (वय 47) याला यवतमाळ पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या वीस वर्षांपासून तो यवतमाळ जिल्ह्यात बनावट ओळखपत्र तयार करून राहत असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
तुलसी महातो याच्यावर सुरक्षा रक्षकांवर हल्ला करणे, खंडणी उकळणे, तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. झारखंड पोलिसांकडून तो गेल्या अनेक वर्षांपासून वाँटेड होता. मात्र, तो बनावट नावाने यवतमाळमध्ये राहत होता आणि कोणालाही संशय येऊ नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला लपवत होता.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई
यवतमाळ पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी विशेष मोहिम राबवत तुलसी महातोला अटक केली. त्याच्या ताब्यातून काही महत्त्वाची कागदपत्रे, बनावट ओळखपत्रे आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सध्या यवतमाळ पोलिसांनी आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. न्यायालयीन आदेशानंतर त्याला झारखंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
या कारवाईबाबत माहिती देताना यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सांगितले की, “आरोपी गेल्या वीस वर्षांपासून यवतमाळमध्ये राहत होता. बनावट कागदपत्रांच्या आधारे तो ओळख लपवून जगत होता. त्याला अटक केल्यामुळे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे आणि यामुळे अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.”
या घटनेमुळे जिल्ह्यातील सुरक्षाव्यवस्थेवर नवे प्रश्न उपस्थित झाले असून, पोलिसांनी अशा प्रकारचे आणखी गुन्हेगार शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.