पंकजा मुंडेंना धक्का, काय आहे प्रकरण?

0

बीड BEED  -भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. त्या अध्यक्ष असलेल्या परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीला काढण्यात आलाय.

या कारखान्यावर २०३ कोटी रुपये थकीत असून, थकीत कर्जाच्या वसुलीसाठी वैद्यनाथ कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया युनियन बँक ऑफ इंडियाने जाहीर केली केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या लिलाव प्रक्रियेवर आता पंकजा काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेय. (Trouble for BJP Leader Pankaja Munde)परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना मागील काही वर्षांपासून अडचणीत आहे. गेल्याच महिन्यात जीएसटी विभागाने वैद्यनाथ कारखान्यास १९ कोटी थकीत असल्याने नोटीस बजावली होती.

असे असतानाच आता वैद्यनाथ कारखान्याकडे कर्ज थकीत प्रकरण समोर आले आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने जाहीर लिलावाची प्रक्रिया हाती घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील युनियन बैंक ऑफ इंडियाच्या उस्मानपुरा शाखेचे २० एप्रिल २०२१ पासून थकीत असलेल्या २०३ कोटी ६९ लाख रुपयांची कर्ज थकबाकी, व्याज व इतर कर्जाच्या वसुलीसाठी प्रक्रिया हाती घेतली आहे.

२५ जानेवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत ऑनलाइन पद्धतीने हा लिलाव होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. हा कारखाना दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी उभा केला होता. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा यासाठी त्यांनी हा कारखाना उभारला होता.