पप्पा जेईई मला झेपत नाही कठोर पप्पानो डोळे उघडा !

0

 

-पुरुषोत्तम आवारे पाटील

शिक्षण क्षेत्रात मोठा गोंधळ सुरु आहे. करियरच्या जीवघेण्या स्पर्धेत आपल्या मुलांनी धावपटू व्हावे अन झेपत नसताना सुद्धा सतत धावत राहावे यासाठी त्यांचे काहीही ऐकून न घेता मुलांना केवळ पिटाळले जात आहे. पालकांनी बघितलेल्या करियर स्वप्नाला पूर्ण करण्याच्या धडपडीत मुलांचे उध्वस्त होणारे भावविश्व् ,मर्यादित क्षमता आणि जगण्याचा शेवट कवटाळणाऱ्या मुलांचे भयावह आक्रंदन कानावर येत नसेल तर तुमच्या पितृत्वाला काहीही अर्थ नाही. पालकांनो तुम्हाला मुलांकडून काय हवे आहे यापेक्षा त्यांना काय बनायचे आहे एवढे साधे गणित जर तुम्ही समजून घेत नसाल तर तुमचे भविष्य अन म्हातारपणाची काठी तुमच्या हातातून केव्हाच निसटली आहे हे कायमचे लक्षात घ्या. मुलांना कशालाही जुंपण्यापूर्वी त्यांच्या क्षमता,इच्छा आवड आणि तयारी तपासून घ्या अन्यथा दरवर्षी राजस्थानच्या कोटा येथे घडणाऱ्या कोवळ्या कळ्यांच्या आत्महत्या मोजण्याची तयारी तरी ठेवा.

आपला मुलगा,मुलगी मोठ्या पदावर जायला हवे हे प्रत्येक पालकांचे स्वप्न असते त्यात काहीही वावगे नाही. त्यासाठी दहावी झाल्यावर मुलांना घराबाहेर काढण्याची तयारी केली जाते. कोटा,दिल्ली,पुणे ,बंगलोर इत्यादी ठिकाणी त्यांची रवानगी केली जाते. राजस्थानातील कोटा हे शहर यासाठी प्रसिद्ध आहे. आजच्या घडीला देशातील विविध राज्यातून सुमारे तीन लाखावर मुले या शहरात कोचिंग घेत आहेत. कोटा हे देशातील प्रमुख कोचिंग हब म्हणून उदयास आलेले आहे. या शहरातील राजीव गांधीनगर,तलवंडी ,जवाहर नगर,विज्ञान विहार,दादावाडी ,लँडमार्क कोरल पार्क बोरखेडा,या भागात उत्तर प्रदेश आणि बिहारी मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या शहरात सुमारे साडेतीन हजार होस्टेल्स आणि पीजी आहेत. शहरातील सात प्रख्यात कोचिंग क्लासेस मध्ये विद्यार्थी प्रवेश घेतात, कोट्याचे सगळे अर्थकारण हेच सात क्लासेस आपल्याभोवती फिरवत असतात.

परवा म्हणजे ८ मार्च रोजी देश जागतिक महिला दिन साजरा करीत असताना याच शहरात बिहारच्या अभिषेक मंडल या १६ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली. पप्पा माझ्याकडून जेईई होणार नाही … माफ करा.. मी जातोय .. अशी चिट्ठी लिहून या कोवळ्या मुलाने जगाचा निरोप घेतला. हा मुलगा विज्ञान नगर मधील हॉस्टेल मध्येच राहायला होता. वारंवार फोन करूनही मुलगा तो उचलत नसल्याचे बघून त्याच्या पित्याला संशय आला आणि त्यांनी हॉस्टेल संचालकाला खोलीत जायला सांगितले तेव्हा मुलाचा मृतदेह सापडला. कल्पना करा ज्याच्यावर स्वप्नांचे सगळे भांडवल लावले आहे अश्या मुलाचे या जगात नसणे या पित्याला काय यातना देऊन गेले असेल ? कमीअधिक फरकाने सगळ्याच शहरांची ही कथा आहे. कोट्यात २०११ पासून आजपर्यंत १३५ मुलांनी आत्महत्या केल्याचे पोलीस रेकॉर्ड सांगते. याच कोटा शहरात २०१७ मध्ये एकाच महिन्यात सर्वाधिक म्हणजे २४ मुलांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे.

मुलांच्या मानसिकतेचा फारसा अभ्यास न करता त्यांना दुसऱ्या राज्यात पाठवले जाते अशावेळी कुटुंबाचा दबाव आणि अत्यंत व्यस्त वेळापत्रकात अभ्यासाचा तणाव आणि वेळेवर उद्भवणाऱ्या असंख्य संकटांशी सामना करताना ही अल्पवयीन मुले उन्मळून पडतात. रागीट पित्याने परतीचे दोर कधीच कापलेले असतात त्याचाही खोलवर परिणाम मुलांच्या भावविश्वावर व्हायला लागतो. अशावेळी हॉस्टेल किंवा पीजीत सकारात्मक मित्र मिळाला तर मुले पुढे या संकटातून मार्ग काढायला शिकतात , कालांतराने उद्भवणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची कला त्यांना आत्मसात होते मात्र प्रारंभातच घडी विस्कटली तर अशी मुले स्वतःला सावरू शकत नाहीत त्यांची भावनिक घसरण सुरूच राहते. तशातच पालकांच्या सहा महिने किंवा वर्षभर भेटी होत नाहीत. दहावी पर्यंत ज्याला नजरेच्या आड कधी केले नाही अश्या लाडक्या मुलाला थेट दुसऱ्या राज्यात धाडले जाते त्याचा मोठा धसका त्याने घेतलेला असतो.

कोट्यात सत्तर टक्के जरी युपी बिहारचे विद्यार्थी असले तरी तीस चाळीस टक्के मराठी मुले आहेत त्या सगळ्यांचे पुढे राज्यवार ग्रुप तयार होतात. थोराड ,श्रीमंत मुले त्यांचे नेतृत्व करतात , त्यांच्यात होणारे राडे आणि व्यसने, मुलींच्या भानगडी या बाबींचा देखील या सगळ्यांवर मोठा परिणाम होत असतो. कोटा उद्योग नगरी असली तरी अलीकडे कोचिंग हाच मोठा उद्योग झाला आहे. तुमची मुले अश्याच कुठल्या ठीकाणी असतील तर त्यांच्याशी अत्यंत आपुलकीने बोला. त्याला झेपत नसेल तर तेवढ्याच सन्मानाने परत बोलवून त्याच्या आवडीच्या क्षेत्रात अन्य काहीतरी करू द्या. लक्षात घ्या ज्याच्यावर जुगार लावला तोच या जगात नसेल तर काय स्थिती निर्माण होईल ? तुमची मुले तुमच्यासाठी सर्वस्व आहेत याची त्यांना वारंवार जाणीव करून द्या आणि स्वतःची अपूर्ण स्वप्ने त्यांच्यावर लादु नका तरच मुले कायमची जवळ राहतील अन्यथा ,कधीतरी फोन येईल अन पप्पा मला माफ करा हा मजकूर वाचावा लागेलं.

 

-पुरुषोत्तम आवारे पाटील
9892162248