मुंबईः रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी पोलीस बळाचा वापर करुन सर्वेक्षण केले जात आहे. या पोलीस दडपशाहीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असून पोलीस बळावर कोणाचा विकास साधायचा आहे? स्थानिक जनतेला विश्वासात न घेता प्रकल्प लादणे ही हुकूमशाही असून कोणत्याही परिस्थिती भाजपा सरकारची ही दादागिरी सहन केली जाणार नाही. बारसू रिफायनरीसाठी जनतेवर दंडेली कराल तर याद राखा, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Maharashtra Congress President Nana Patole)यांनी दिला आहे.
यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष जनतेच्या हितासाठी नसून शेतकरी, तरुण, महिला, कामगार व जनताविरोधी आहे. विकासाला काँग्रेसचा विरोध नाही पण स्थानिकांना उद्ध्वस्थ करणारा प्रकल्प असेल, स्थानिक जनतेचा त्या प्रकल्पाला विरोध असेल तर त्यांच्याशी चर्चा करुन संवादातून मार्ग काढला जाऊ शकतो. जनतेच्या मनात जर रिफायनरी प्रकल्पाबाबत काही शंका असतील तर भाजपा सरकार स्थानिक जनतेच्या शंकांचे निरसन का करत नाही? पोलीसांचा फौजफाटा घेऊन कसले सर्वेक्षण करता? ही दादागिरी, हुकूमशाही चालू देणार नाही. आम्ही सर्वजण कोकणातील स्थानिक जनतेच्या बरोबर आहोत. दिल्लीतील मोदी-शहांचे हस्तक असलेले राज्यातील शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताकडे लक्ष देत नाही. बारसू रिफायनरी प्रकल्प पोलीस बळाचा वापर करून लादणाऱ्यांनी हा जोर वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस, सारखे लाखो तरुणांना रोजगार देणारे प्रकल्प गुजरातच्या घशात घालताना का लावला नाही? अशी तत्परता व असाच जोर त्यावेळी दाखवला असता तर महाराष्ट्रातील लाखो तरुणांना रोजगार मिळाले असते पण दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या भाजपाप्रणित शिंदे सरकारने त्यावेळी महाविकास आघाडीवरच खापर फोडले. बारसू रिफायनरीसाठी स्थानिकांना विश्वासात घेऊनच निर्णय झाला पाहिजे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.