नागपूर : (nagpur)अकोल्याच्या पाणीप्रश्नावरून विनापरवानगी यात्रा काढणारे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर पोलिसांनी अखेर कारवाई केली. आमदार देशमुख यांनी अकोला ते नागपूर अशी जलसंघर्ष यात्रा (Police Action on Jal Sangharsh Yatra) काढली. ही यात्रा काढण्यासाठी कुठलीही पोलिस परवानगी घेतली नव्हती. नागपूरच्या सीमेवर ही यात्रा रोखण्यात आली असून पोलिसांनी आमदार नितीन देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 10 एप्रिल रोजी या यात्रेला अकोल्यातून सुरुवात झाली होती. या यात्रेनं 250 किलोमीटरचे अंतर पार केले होते. अद्याप 30 किलोमीटर अंतर जाणे बाकी होते. त्यापूर्वीच कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. ही यात्रा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानावर नेण्याचे आंदोलकांचे प्रयत्न होते.
संघर्ष यात्रा धामणा येथे पोहोचल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी परिसरात मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी आमदार देशमुखांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिस आता देशमुखांना घेऊन अकोल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन राज्य सरकारवर टीका केली आहे. विदर्भात पाणी आक्रोश केला म्हणून अटक केली. राज्यात जणू मोगलाई अवतरली आहे. सरकार जनतेलाच घाबरु लागल्याचे संजय राऊतांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.