
शिल्लक..”..आंबेडकरांचा निशाणा
सोलापूर SOLAPUR : इंडिया आघाडीचे भवितव्य काँग्रेसच्या Congress ताठरपणामुळेच धोक्यात आले असून इंडिया आघाडीची वाटचाल जवळपास संपुष्टात आली असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष Prakash Ambedkar प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. काँग्रेसचा हेतू पक्ष वाढवणे आहे की केंद्रातील मोदी सरकार घालवणे आहे, असा सवाल उपस्थित करून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
माढा येथील आघाडीचा कार्यक्रम आटोपल्यावर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. आंबेडकर यांची ही प्रतिक्रिया अशावेळी आली आहे की, महाविकास आघाडीतून वंचित बहुजन आघाडीला बैठकीचे निमंत्रण आले आहे व आघाडीचे प्रतिनिधी पुढच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. आंबेडकर म्हणाले, काँग्रेस जर एकटी मोदींना हाताळू शकली असती तर त्यांनी इतरांना बरोबर घेतले नसते. जर तुमची ताकद नाही तर इतरांना बरोबर घेता त्यावेळी तुम्ही इज्जत द्यायला व शेअर करायलाही शिकले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. महाराष्ट्र हे महत्वाचे राज्य आहे. काँग्रेसने येथे इज्जत द्यायला आणि शेअर करायला शिकले पाहिजे. तुम्ही जागांच्या बाहेर कितीही अवास्तव मागण्या केल्या तरी बैठकीत बसल्यावर भान ठेवले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
आंबेडकर म्हणाले की, राज्यात ४८ लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची मोठी ताकद आहे. प्रत्येक मतदारसंघात आमचे दोन ते अडीच लाख मतदार आहेत. आता उद्या होणाऱ्या राज्यातील लोकसभा जागा वाटप बैठकीला आमच्या पक्षांचे प्रतिनिधी जाऊन इतर पक्षांची भूमिका ऐकून घेतील आणि मगच जागावाटपाबाबत दावा केला जाईल, असे ते म्हणाले.
आंबेडकर म्हणाले की, इंडिया आघाडीची स्थापना झाली त्यावेळी नितीशकुमार यांच्याकडेच तो पुढाकार ठेवायला पाहिजे होता. यात कुरघोड्या झाल्या आणि काँग्रेसने दुसरी यात्रा काढली यात इंडिया आघाडीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले गेले नाही, असे आंबेडकर यांनी सांगितले. आपला फक्त वापराचं होणार असेल आणि आपल्याला इज्जतच मिळणार नसेल तर या आघाडीत राहावे कशाला, अशी मानसिकता इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची झाल्याचा दावा आंबेडकर यांनी केला. आता इंडियात काँग्रेस आणि अखिलेश एवढेच शिल्लक राहिले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी विभक्त झाली आहे. आता ती काय भूमिका घेते, हे पाहावे लागेल, असा टोला आंबेडकर यांनी शरद पवार यांना लगावला.