राष्ट्रवादीच्या निर्णयासाठी नार्वेकरांना मुदतवाढ

0

नवी दिल्ली  NEW DELHI : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता याचिका प्रकरणी SC सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली असून न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर  Rahul Narvekar यांना निर्णय देण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. विधिमंडळ सचिवालयाच्या वतीने ही मागणी करण्यात आली होती. त्यावर आता १५ फेब्रुवारीपर्यंत नार्वेकरांनी निर्णय घ्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दरबारी प्रलंबित असून ३१ जानेवारीपर्यंत याप्रकरणी निकाल देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिले होते. परंतु, आता सर्वोच्च न्यायालयाने विधासनभा अध्यक्षांना मुदतवाढ दिली आहे. आज, जयंत पाटलांनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.

सर्वोच्च न्यायालयाने ३० ऑक्टोबर २०२३ रोजी विधानसभा अध्यक्षांना ३१ जानेवारी २०२४ पर्यंत घटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. मुदत संपण्याच्या दोन दिवस अगोदर विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयात तीन आठवड्यांचा अतिरिक्त वेळ मागितला आहे.