
युद्ध फक्त स्थगित झाले, संपले नाही!
नवी दिल्ली:(New Delhi)
अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्याआडून चाललेले ब्लॅकमेलिंग सहन
करणार नाही,दहशतवाद आणि व्यापार, शांतीवार्ता एकत्र शक्य नाही,पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही,
पाकिस्तानशी यापुढे बोलणी झालीच, तर ती दहशतवाद आणि पीओकेवरच होईल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज देशाला संबोधित करताना जगाला ठणकावले. मंगळवारी राष्ट्राला उद्देशून ते बोलत होते.
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय, युद्ध थांबले आहे, संपले नाही़ यापुढे पाकिस्तान काय भूमिका घेतो, कसा वागतो हे पाहणार आहोत, पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाईल, असा सूचक इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगाला इशारा दिला. यावेळी त्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. तसेच ऑपरेशन सिंदूर, पहलगाम हल्ल्याबद्दलही भाष्य केले.
ऑपरेशन सिंदूर हे केवळ नाव नाही. ते देशाच्या कोटी कोटी लोकांची भावनाचे प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. ६ मे रोजी रात्री उशिरा, ७ मे च्या सकाळी संपूर्ण जगाने या प्रतिज्ञेला परिणामात बदलेले पाहिले आहे. भारताच्या सैन्याने पाकिस्तानातील आतंकाच्या अड्ड्यावर, त्यांच्या ट्रेनिंग सेंटरवर अचूक प्रहार केला. दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल, भारत एवढा मोठा निर्णय घेईल. पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर भारताच्या मिसाईलने हल्ला केला, ड्रोनने हल्ला केला, तेव्हा दहशतवाद्यांच्या इमारतीचे नव्हे तर त्यांचे अवसानही गळाले. बहावलपूर आणि मुरीदके सारखे दहशतवाद्यांचे अड्डे ग्लोबल टेररिझमची युनिव्हर्सिटी होती. जगात कोणतेही मोठे अतिरेकी हल्ले झाले असेल, लंडन ट्युब बॉम्बिंग असेल किंवा भारतातील हल्ले असतील त्यांचे कनेक्शन दहशतवाद्यांच्या या अड्ड्यांशी जोडलेले होते. दहशतवाद्यांनी आमच्या बहिणींचे कुंकू पुसले. त्यामुळे आम्ही दहशतावाद्यांचे हे हेड क्वॉर्टर उद्ध्वस्त केले. पहिल्या तीन दिवसातच भारताने पाकिस्तानला एवढे बरबाद केले की, पाकिस्तानला त्याचा अंदाज नव्हता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारताच्या आक्रमकतेमुळे पाकिस्तान वाचण्यासाठी मार्ग शोधत होता. जगभरात तणाव दूर करण्यासाठी धावत होता. पण नंतर मजबुरीने १० मे रोजी पाकिस्तानच्या सैन्याने आमच्या डीजीएमओला संपर्क केला. तोपर्यंत आपण दहशतवाद्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर उद्धवस्त केले होते. अनेक अतिरेकी मारले होते. पाकिस्तानच्या हृदयातील दहशतवाद्यांचे अड्डे भग्न करून सोडले होते. त्यामुळे जेव्हा पाकिस्तानकडून याचना केली गेली. पाकिस्तानकडून जेव्हा सांगितले गेले की त्यांच्याकडून पुढे कोणतीही दहशतवादी कारवाई केली जाणार नाही. सैन्य गोळीबार होणार नाही. त्यावर भारताने विचार केला. आम्ही पाकिस्तानचे दहशतवादी आणि सैन्य ठिकाण्यावर प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन आता फक्त स्थगित केले आहे. येत्या काळात आम्ही पाकिस्तान काय भूमिका घेतो कसा वागतो हे पाहणार आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे चोख प्रत्युत्तर दिले. पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतानं एअर स्ट्राईक केले. या एअर स्टाईकमध्ये ९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्यामध्ये १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केले. त्यालाही भारताने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानचे अनेक एअरबेस आणि रडार सिस्टिम उद्ध्वस्त केले. आता दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूरबद्दल एक मोठे विधान केले आहे.
पाकिस्तानने शाळा, गुरुद्वारा, मंदिर, घरांना लक्ष्य केले. गेल्या अडीच ते तीन दशकांपासून पाकिस्तानात दहशतवादाचे आका खुलेआम फिरायचे. हे आका भारताविरोधात षड्यंत्र करायचे. याच आकांना भारताने एका झटक्यात समाप्त करून टाकले. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान घोर निराशेत गेला. पाकिस्तान हताश झाला होता. याच निराशेत पाकिस्तानने आणखी एक धाडस केले. दहशतवादाला नष्ट करण्यासाठी भारताच्या कारवाईला साथ देण्याऐवजी पाकिस्ताने भारतावरच हल्ला करणे चालू केले. पाकिस्तानने शाळा, कॉलेज, गुरुद्वारा, मंदिर, सामान्य नागरिकांच्या घरांना लक्ष्य केले. पाकिस्तानने आमच्या लष्करी तळांना लक्ष्य केले. पण यातही पाकिस्तानचा बुरखा फाटला,असे नरेंद्र मोदी म्हणाले.
जगाने पाहिले की, पाकिस्तानचे ड्रोन्स, पाकिस्तानच्या मिसाईल्स अयशस्वी ठरल्या. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने या हल्ल्यांना आकाशातच नष्ट केले. पाकिस्तानची तयारी ही सीमेवर हल्ला करण्याची होती. पण भारताने पाकिस्तानच्या छातीवर वार केला. भारताचे ड्रोन्स, भारताच्या मिसाईल्सने ठरवलेल्या लक्ष्यांवर बरोबर हल्ले केले. भारतीय लष्कराने पाकिस्ताच्या हवाई तळांना नेस्तनाबूत केले. भारताने पहिल्या तीन दिवसांत पाकिस्तानला उद्धवस्त केले. त्यामुळे भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान स्वत:ला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता. पूर्णपणे मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानने १० मेच्या दुपारी पाकिस्तानी सेनाने आपल्या डीजीओमओंना संपर्क केला, अशी ही माहिती मोदी यांनी दिली.