Home MAHARASHTRA शिवशौर्याची गाथा सांगण्यासाठी नागपुरात सोमवारी घुमणार, राहुल गिरींची गर्जना

शिवशौर्याची गाथा सांगण्यासाठी नागपुरात सोमवारी घुमणार, राहुल गिरींची गर्जना

0

महावितरणतर्फे ‘शिव व्याख्याना’चे आयोजन

नागपूर (Nagpur) दि. 20 फेब्रुवारी 2026: – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासातील प्रेरणादायी प्रसंग, स्वराज्यासाठी दिलेला अतुलनीय लढा आणि त्यांच्या नेतृत्वाचे अष्टपैलू पैलू उलगडण्यासाठी नागपुरात एका भव्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध शिवव्याख्याते राहुल गिरी यांच्या ओघवत्या वाणीतून साकारणारे हे ‘शिव व्याख्यान’ येत्या सोमवार, दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता गड्डीगोदाम येथील ‘प्रकाश भवन’ परिसरात पार पडणार आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण व पारेषण कंपनी नागपूर परिमंडळ आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समिती 2026 यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणचे प्रादेशिक संचालक परेश भागवत भूषविणार असून, प्रमुख अतिथी म्हणून महावितरण नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके आणि महापारेषणचे मुख्य अभियंता सतीश अणे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी अधीक्षक अभियंता अमित परांजपे, मंगेश वैद्य, संजय वाकडे, राकेश जनबंधू, वैभव पाथोडे यांसह अन्य मान्यवर उपस्थित राहतील.

छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र केवळ इतिहास नसून तो भविष्यासाठी एक आदर्श विचार आहे. महाराजांचे शौर्य आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य समाजातील प्रत्येक घटकापर्यंत, विशेषतः युवा पिढीपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या व्याख्यानाच्या माध्यमातून शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा दिला जाणार असून, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.