राजमाता माधवी सिंधीया यांचे दीर्घ आजाराने निधन

0

ज्योतिरादित्य शिंदे यांना मातृशोक

नवी दिल्ली(New Delhi), 15 मे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आई राजमाता माधवी राजे सिंधिया(Mother Rajmata Madhavi Raje Scindia) यांचे आज, बुधवारी निधन झाले. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर उद्या, गुरुवारी ग्वाल्हेरमध्ये अंतीमसंस्कार होणार आहेत.

ग्वाल्हेर राजघराण्याच्या राजमाता आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आई माधवी राजे शिंदे यांचे बुधवारी सकाळी 9.28 वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्या 70 वर्षांच्या होत्या. राजमाता माधवी राजे शिंदे या मूळच्या नेपाळच्या होत्या. त्या नेपाळच्या राजघराण्याशी संबंधित होत्या. त्यांचे आजोबा युद्ध समशेर बहादूर नेपाळचे पंतप्रधान होते. ग्वाल्हेर संस्थानचे राजे आणि माजी केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे आणि माधवी राजेंचा 1966 मध्ये विवाह झाला होता. विवाहापूर्वी त्यांचे नाव राजलक्ष्मी राणा होते तर लग्नानंतर त्यांचे नाव माधवी राजे असे ठेवण्यात आले. याच नावाने त्या जगभर ओळखल्या जात होत्या. गेल्या काही महिन्यांपासून न्यूमोनिया आणि इतर आजारांमुळे माधवी राजे यांची प्रकृती खालावली होती. गेल्या 15 फेब्रुवारी रोजी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते आणि तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावली होती. गेल्या काही दिवसांपासून त्या व्हेंटिलेटरवर होत्या. ज्योतिरादित्य भाजपच्या कार्यक्रमांपासूनही दूर राहिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमालाच हजेरी लावली होती. त्यानंतर ते सतत दिल्लीत राहिले. निवडणूक प्रचारादरम्यानही ते वेळोवेळी दिल्लीला भेट देत राहिले. निवडणूक प्रचार संपताच ज्योतिरादित्य यांचे संपूर्ण कुटुंब दिल्लीत आले होते. दरम्यान माधवी राजेंच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केलाय.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा