बारामतीमध्ये पुन्हा मतमोजणी होणार?युगेंद्र पवारांनी उचलले टोकाचे पाऊल

0
बारामतीमध्ये पुन्हा मतमोजणी होणार?युगेंद्र पवारांनी उचलले टोकाचे पाऊल
re-counting-in-baramati

पराभूत झाल्यानंतर युगेंद्र पवार यांनी उचलले असे पाऊल

राज्यातील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेची निवडणूक बारामतीची ठरली होती. बारामतीमध्ये लोकसभेप्रमाणे विधानसभेतही पवार कुटुंबियांमध्ये लढत झाली. काका अजित पवार आणि पुतण्या युगेंद्र पवार यांची लढत चर्चेची ठरली. या लढतीत अजित पवार विजयी झाले. त्यानंतर काकाविरुद्ध पुतण्याने पुन्हा फेरमतमोजणीचा अर्ज दिला आहे. त्यासाठी लागणारी रक्कमसुद्धा भरली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये पाच टक्के ईव्हीएमची फेरमतमोजणी होणार आहे, असे युगेंद्र पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

पुणे जिल्ह्यातून ११ उमेदवारांनी पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. त्यासाठी ६६ लाख रुपये भरले आहेत. यासंदर्भात बोलताना युगेंद्र पवार (Yugendra Pawar) म्हणाले, विधानसभा निवडणुकीत फक्त माझाच पराभव झाला असता तर मी अर्ज केला नसता. कारण बारामतीमध्ये कोणी उभे राहण्यासाठी तयार नव्हते. आमच्या पुढची ताकद मोठी होती. आमच्या पुढे आव्हान मोठे होते. राज्याचे उपमुख्यमंत्री होते. परंतु आम्ही विचार सोडले नाही. त्यामुळे आम्ही लढलो.

आम्ही पराभूत झालो असलो तरी बारामतीकरांसाठी आम्ही काम करत आलो आहे. यापुढेही करत राहू, असे युगेंद्र पवार यांनी म्हटले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीबाबत अख्ख्या महाराष्ट्रात संशयाचे वातावरण आहे. दिग्गज नेते जे अनेक दशकांपासून निवडून येत आहेत, त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आम्ही पक्षाच्या बैठकीत यावर चर्चा केली. त्यानंतर आम्हाला सुप्रीम कोर्टाने 5 टक्के ईव्हीएम तपासायचा अधिकार दिला आहे. त्यानुसार आम्ही पडताळणीसाठी अर्ज करणार आहोत.