९ व्या वर्गातील सिद्धांत शृंगारेच्या व्हॉट इफ स्पेस पुस्तकाचे प्रकाशन

0

व्हॉट इफ स्पेस पुस्तकाचे प्रकाशन

नागपूर  : १३ वर्षाच्या सिद्धांत सुशांत शृंगारे या विद्यार्थ्याने इंग्रजीत लिहिलेल्या व खगोल शास्त्रावर आधारित व्हॉट इफ स्पेस या पुस्तकाचे प्रकाशन माजी मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते नुकताच करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात सिद्धांतच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमिताने त्याच्याकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सार्थ पद्धतीने अभिवादन करण्यात आले.
आर्यनगर येथील बोधीसत्व सामाजिक संस्था धम्मज्योती महिला मंचच्या वतीने भिमज्योती महोत्सव -२०२३ या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी विशेष अतिथी असलेल्या माजी ऊर्जामंत्री आ.डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश दोडके होते.
सुशांत व अश्विनी शृंगारे यांचे चिरंजीव असलेल्या सिद्धांतचे व्हॉट इफ स्पेस हे विज्ञान कथेचे पुस्तक असून यात लेखकाच्या कल्पनेवर आधारित कथांचा समावेश आहे. तसेच यात पुनर्संचयित खगोलीय वस्तू,अस्तित्वात नसलेल्या वेळेचे परिणाम, कृष्णविवराची सूर्याची टक्कर यासारख्या मनोरंजक विषयांची माहिती देण्यात आली आहे. सिद्धांत शृंगारे यांचे वडील सुशांत शृंगारे महावितरण मध्ये यंत्रचालक म्हणून कार्यरत आहे. तर आई उच्च माध्यमिक शाळेत शिक्षिका आहेत.कार्यक्रमात बंडोपंत टेंभुर्णे, सुरेश जगयासी,महेंद्र गजभिये यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी सिद्धांत यांचे अभिनंदन केले आहे.