

नागपूर[Nagpur], 13 जून:विदर्भ साहित्य संघातर्फे पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर[Ahilyabai Holkar] यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित ‘पुण्यश्लोक देवी अहल्याबाई’ या सुप्रसिद्ध नाट्यकलावंत दीपाली घोंगे यांच्या एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले. त्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डॉ. दीपाली घोंगे यांनी अल्पावधित अहल्याबाईंचा जीवनप्रवास उपस्थितांना साभिनय घडविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते उपस्थित होते. तसेच सरचिटणीस विलास मानेकर, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र डोळके, ग्रंथालय प्रमुख डॉ. विवेक अलोणी उपस्थित होते. शारदास्तवन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. वैयक्तिक आयुष्यापासून राजकारणापर्यंतचा त्यांचा प्रवास दीपाली यांनी अतिशय बोलक्या पद्धतीने सादर केला. देवधर्म आणि राष्ट्रधर्म एकच असल्याचे त्यांनी त्यांच्या जीवनातून सांगितले.
माणकोजी शिंदे यांची कन्या मल्हारराव होळकरांचा मुलगा खंडेराव यांची पत्नी झाली. ज्या काळात स्त्रियांना शिक्षण घेणे अवघड अशा काळात मल्हारराव होळकरांनी आपल्या सुनेला युद्धशास्त्र, धर्मशास्त्र शिकवले. शस्त्र आणि शास्त्र, तसेच नीतीमत्ता याबाबत त्यांना ज्ञान दिलं. परंतु एका युद्धात त्यांचे पती खंडेराव यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात वादळ निर्माण झाले. त्यावर त्यांनी कशा पद्धतीने मात केली याचे अतिशय चांगले सादरीकरण त्यांनी केले. राजकीय डावपेच, न्यायप्रियता, सात्विकता, योग्य निर्णयक्षमता अशा त्यांच्या गुणांमुळे त्या लोकप्रिय ठरल्या.
मनोरंजनातून समाजप्रबोधन करणे हा त्यांचा प्रयोग सादर करण्यामागील मुख्य उद्देश असून युवा पिढीला अहल्याबाईंचा इतिहास माहिती व्हावा याकरिता दीपाली घोंगे शाळा-कॉलेजेसमधूनही याचे सादरीकरण करतात. या प्रयोगाचे लेखन, दिग्दर्शन त्यांनी स्वतः केले असून त्यांनी आपल्या दमदार सादरीकरणाने रसिकांना खिळवून ठेवले. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. विवेक अलोणी यांनी केले. प्रयोगानंतर प्रदीप दाते व विलास मानेकर यांनी त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.