Samridhi mahamarg समृद्धी महामार्गावर बस उलटली, २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

0

 

Buldhana बुलडाणा : समृद्धी महामार्गावर samruddhi marg शुक्रवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या भीषण अपघातात २६ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. बसमधील बहुतांशी प्रवाशी नागपुरातील तर काही प्रवासी वर्धा व यवतमाळमधील होते. (Accident on Samruddhi Highway) बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा या गावाजवळ हा अपघात झाला. नागपूरहून पुण्याकडे निघालेली विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस या गावाजवळ अनियंत्रित झाली व ती सुरुवातीला उजव्या बाजुला असलेल्या खांबावर धडकली. त्यानंतर ती महामार्गाच्या मधोमध असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या दुभाजकावर धडकून उलटली. त्यामुळे बसची डिझेल टाकी फुटून बसने पेट घेतला. या स्थितीत प्रवाशांना बसमधून बाहेर पडता न आल्याने २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर केवळ सात ते आठ प्रवाशांनी बसच्या काच फोडून स्वतःचा जीव कसाबसा वाचविल्याची माहिती मिळत आहे. या बसमध्ये अंदाजे ३२ प्रवासी होते, अशी माहिती मिळत आहे. अपघात झाला त्यावेळी आतील प्रवासी गाढ झोपेत होते.

या अपघाताची माहिती देताना बुलढाण्याचे पोलीस अधिक्षक सुनील कडासने यांनी सांगितले की, अपघातानंतर बसचा दरवाजा खाली आल्याने प्रवाशांना बाहेर पडता आले नाही

काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, रात्री दीड वाजताच्या सुमारास अतिशय वेगाने जात असलेली ही बस सुरुवातीला एका लोखंडी खांबावर व नंतर रस्ता दुभाजकावर धडकली. त्यानंतर ही बस दरवाजा असलेल्या बाजुनेच उलटल्याने दरवाजा खाली आला. त्यामुळे बसमधून बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला. अशातच बसची डिझेल टाकी फुटून बसने पेट घेतला. काही वेळातच संपूर्ण बस आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली. या परिस्थितीत आतील प्रवाशांची अवस्था अत्यंत विदारक झाली. जीवाच्या आंकांताने प्रवाशी बसमधून बाहेर पडण्याची धडपड करीत होते. मात्र, त्यांच्यापैकी सात ते आठ जणांना खिडकीच्या काच फोडून स्वतःची सुटका करून घेण्यात यश आले. बहुतांशी प्रवाशांना बाहेर पडता न आल्याने २६ जणांचा अक्षरशः होरपळून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह काळेठिक्कर पडले होते. तो ओळखता देखील येत नव्हते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

या अपघातात बसचे चालक व वाहक थोडक्यात बचावल्याची माहिती आहे. पोलिसांनी चालकाची चौकशी केली असता त्याने सुरुवातीला बसचा टायर फुटल्याने ती खांबावर आदळल्याचा दावा केलाय.

या बसमधील सर्वाधिक प्रवाशी नागपूरचे होते. त्यानंतर त्यात वर्धा व यवतमाळमधूनही काही प्रवासी चढल्याची माहिती आहे. पोलिसांनी बसमधील प्रवाशांची यादी मागविली आहे. बसमध्ये काही कॉलेज विद्यार्थी व लहान मुलेही होती, अशी माहिती आहे.

५ लाखांची मदत जाहीर

अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या उपचारांचा सर्व खर्च सरकार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, अपघाताच्या चौकशीचे आदेश

 

मुंबईद – बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दॅवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश ही दिले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

ही दुर्घटना कळताच तातडीने महामार्गासाठी तैनात आपत्कालीन वैद्यकीय सेवा पथक तसेच अग्निशमन दल त्याठिकाणी पोहचले आणि त्यांनी बचाव कार्य सुरु केले. जखमी प्रवाशांना काढून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.