
चंद्रपूर (Chandrapur):- चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सौ. संगीता राजेंद्र खांडेकर यांची अवघ्या एका मताने विजयी निवड झाली. त्यांच्या निवडीमुळे चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपाचा झेंडा पुन्हा एकदा फडकला असून शहराच्या राजकीय वर्तुळात या निवडीची मोठी चर्चा सुरू आहे. दरम्यान नवनियुक्त महापौर संगीता खांडेकर यांचे पती राजेंद्र खांडेकर हे 31 जानेवारी रोजी आपल्या नोकरीच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले होते.
महापौर निवडणुकीदरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मध्यस्थीनंतर संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने भाजपाला पाठिंबा जाहीर केला. या पाठिंब्यामुळे भाजपाचा विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
सौ. संगीता राजेंद्र खांडेकर यांचा जन्म २५ सप्टेंबर १९७३ रोजी झाला. त्या मागील सुमारे ३० वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय आहेत. पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी वार्डा-वार्डामध्ये जनसंपर्क साधत पक्ष बळकट करण्यासाठी सातत्याने मेहनत घेतली आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेत (Chandrapur Mahanagarpalika) त्या मागील आठ वर्षांपासून नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत. २०१७ च्या निवडणुकीत विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक १५ मधून त्यांनी ५७४२ मते मिळवत ३२४२ मतांनी विजय संपादन केला होता. तसेच त्यांनी महानगरपालिकेत झोन सभापती पदाची जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडली आहे.
२०२६ च्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी पुन्हा विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक १५, ओबीसी (अ) गटातून निवडणूक लढवून ४४३२ मते मिळवत तब्बल १९०० मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळविला. या निवडणुकीत चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्याने त्यांची महापौरपदी दावेदारी अधिक भक्कम झाली.
संगीता खांडेकर यांच्या पती राजेंद्र विठोबाजी खांडेकर हे देखील भारतीय जनता पक्षाचे मागील ४० वर्षांपासून निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. ते महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असून कुणबी समाजाचे मागील ३० वर्षांपासून अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे.
राजेंद्र खांडेकर हे छोटूभाई पटेल हायस्कूल, शिवाजी चौक, चंद्रपूर येथे ३२ वर्षे कार्यरत होते. ३१ जानेवारी २०२६ रोजी ते सेवानिवृत्त झाले. शिक्षकेतर संघटनेमध्ये त्यांनी जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले असून संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
सौ. संगीता खांडेकर यांच्या शांत, मनमिळावू आणि लोकाभिमुख स्वभावामुळे त्या मतदारांमध्ये लोकप्रिय आहेत. शहराच्या विकासासाठी ठोस निर्णय घेऊन चंद्रपूरचा सर्वांगीण विकास साधण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे. त्यांच्या निवडीमुळे शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.














