-पुरुषोत्तम आवारे पाटील
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची पाऊले सतत वादग्रस्त ठरताना दिसत आहेत. ज्या पदावर वसंतराव नाईक,वसंतदादा पाटील,शरद पवार,एआर अंतुले,प्रतिभाताई पाटील,मधुकरराव चौधरी आणि दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्यासारख्या दिग्गजांनी काम करून या खात्याचे नाव मोठे केले त्याच खात्याचे मंत्री म्हणून काम करताना अब्दुल सत्तार सतत या खात्याची इभ्रत कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
त्यांनी अकोल्यात खात्यामार्फत जे धाडसत्र घडवून आणले त्याचा पुरता बोऱ्या वाजला आणि त्यासोबतच शिंदे सरकारच्या हेतूबद्दल लोकांच्या मनात संशय निर्माण करून दिला आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या गप्पा मारताना कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्यांवर धाडी घालताना स्वतःची माणसे त्यात घुसविण्याचा अचाट पराक्रम अब्दुल सत्तार यांनी करून या सरकारची नाचक्की करण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. सत्तार यांचे इरादे शेतकरी हिताचे असतात यावर आता कुणी भरवसा ठेवायला तयार नाही.
देवेंद्र फडणवीस यांच्या सारखा जबाबदार नेता ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्या अकोला जिल्ह्यातील व्यावसायिकांवर स्वतःची माणसे असलेली टीम तयार करून धाडसत्र राबवले जात असेल आणि सगळे व्यावसायिक त्याची तक्रार करीत असतील तर अब्दुल सत्तार यांच्या पथकाने चार दिवसात अकोल्यात खरोखर धाडी टाकल्या की हप्ते वसुलीचा प्रयत्न केला असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील ४० कृषी अधिकाऱ्यांचे पथक गठीत करून त्यात आपला स्वीय सहायक दीपक गवळी याला पाठविण्याचे नेहमीचे कसाब कृषिमंत्र्यांनी करून स्वतःचे इरादे नेक नसल्याचे दाखवून दिले आहे. बोगस बियाणे संदर्भात ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत तो हितेश भट्टड नावाचा स्थानिक व्यक्ती या पथकाला दिशानिर्देश देत होता यावरून हे तपासणी नसून वसुली पथक असल्याचा आरोप दोन आमदारांनी करून या पथकाची आणि पर्यायाने अब्दुल सत्तार यांची पोलखोल केली आहे.
हवालदिल शेतकऱ्यांचे रक्तपिण्याचे काम आपल्या राज्याचा कृषिमंत्री तपासणी पथकाचा बनाव करीत करीत असेल तर हे या राज्याचे दुर्दैव आहे. काही महिन्यांपूर्वी सिल्लोड कृषी महोत्सवाच्या नावावर राज्यातून कोट्यवधी रुपये अधिकाऱ्यांना जमा करण्याचे आदेश याच सत्तार यांनी दिल्याचा आरोप झाला होता. मंत्रिपदाचा उपयोग त्यातून मोठ्या प्रमाणावर पैसे काढण्यासाठी करताना अशी अनैतिक मशागत करणारा पहिलाच कृषिमंत्री या राज्याला बघावा लागत आहे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आणि सरकारचा चुकलेला निर्णय आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते. ऐन खरिपाच्या तोंडावर कीटकनाशके,खते अश्या कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्यांवर धाडी पडतात मात्र त्यात शेतकरी हिट दडलेले असते जे यावेळी दिसून आले नाही. या पथकात अब्दुल सत्तार यांनी तब्बल ६ माणसे पद्धतशीरपणे घुसवली होती हे आता उघड झाले आहे. माध्यमांच्या हे लक्षात आल्यावर सत्तार याना नेमके उत्तर देता आले नाही.
व्यावसायिक जर शेतकऱ्यांची फसवणूक करीत असतील तर त्यांना अद्दल घडलीच पाहिजे यात कुणाचेही दुमत नाही मात्र शेतकरी हिताच्या आड आपली पोळी शेकून घेण्याचा अफलातून प्रयत्न अब्दुल सत्तत्तर यांनी केल्याचे या पर्यटनातून उघड झाल्याचे दिसत आहे. समजा हे तपासणी पथक कृषी अधिकाऱ्यांचे असेल तर त्यात मंत्र्यांचे पीए द्दीपक गवळी,ओएसडी प्रशांत ठाकरे ,संभाजी नगरचे माजी जिप अध्यक्ष आणि सत्तार यांचे समर्थक श्रीराम महाजन ,तसेच नागपूरचा हितेश भट्टड या सगळ्यांचा कसाकाय समावेश झाला याचे उत्तर कृषिमंत्री देऊ शकले नाहीत. सत्त्तार याना अकोल्यात पत्रकारांनी दीपक गवळी बाबत विचारले असता दीपक गवळी माझा पीए नाही तर कृषी अधिकारी आहे असे सत्तार म्हणाले. प्रत्यक्षात गवळी हा त्यांचा पीए असल्याचे त्यांच्या संभाजीनगर जिल्हा दौऱ्याच्या पत्रातून स्पष्ट झाले आहे. कृषिमंत्री धादांत खोटे बोलत असल्याचे सुद्धा उघड झाले आहे.
कृषी व्यावसायिकांना कारवाईची धमकी देऊन त्यांना मोठ्या रकमांची मागणी करण्यात आल्याची तक्रार अनेक व्यावसायिकांनी केली आहे. अश्या प्रकारच्या धाडी टाकण्यापूर्वी किमान सूचना देणे आवश्यक असताना या प्रकरणी नियमांची कोणतीही पूर्तता केल्याचे दिसत नाही.स्वतःची माणसे पथकात घुसवून पैश्याचे पीक घेणारा असा अफलातून कृषिमंत्री हा महाराष्ट्र प्रथमच बघत आहे. हे प्रकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीरतेने घेऊन तात्काळ सरकारला बदनामीचा असा डाग लावणाऱ्या अब्दुल सत्तार याना घरचा रस्ता दाखवायला हवा. जाऊ तिथे खाऊ अश्या प्रकारची काही माणसेराजकारणात असतात त्यांनीच यंत्रणा बदनाम करून ठेवल्या आहेत. अशी माणसे क्षणभर सुद्धा शिंदे यांच्या सेनेने पोसू नयेत नयेत. आगामी काळात ज्यांना डच्चू मिळणार आहे त्यात याच सत्त्तार यांचे नाव आहे आता या प्रकरणानंतर अश्या बदनाम कृषिमंत्र्याला घरचा रस्ता दाखविण्यावर सुद्धा शिंदे- फडणवीस यांनी शिक्कामोर्तब करायला हवे.