मुंबई- MUMBAI “राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे..” या टॅगलाईनने राज्यभरात झळकलेली शिवसेनेची (शिंदे गट) जाहिरात राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरली आहे. या जाहिरातीत एका कथित सर्वेक्षणाची माहिती देण्यात आली असून त्यात मतदारांनी मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना अधीक पसंती दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. या जाहिरातीनुसार, महाराष्ट्रातील २६.१ टक्के जनतेला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून हवेत तर देवेंद्र फडणवीस यांना २३.२ टक्के लोकांची पसंती दिल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, ही जाहिरात एका वाहिनीने केलेल्या सर्व्हेक्षणाच्या आधारे देण्यात आली असून त्यात वावगे काहीही नाही, असे भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तर ठाकरे गटाने आता या जाहिरातीवरून शिंदे व भाजपला लक्ष्य केले आहे.
राज्यातील ४९.३ टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शवल्याचे देखील या जाहिरातीमध्ये म्हटले आहे. या सर्व्हेमध्ये भाजपला ३०.२ टक्के आणि शिवसेनेला १६.२ टक्के जनतेने कौल दिला आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील ४६.४ टक्के जनता भाजप शिवसेनेच्या युतीसोबत असल्याचा दावा देखील जाहिरातीत करण्यात आलाय.
काय म्हणाला भाजप?
या जाहिरातीवर प्रतिक्रिया देताना भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रांने केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपला जास्त मते तर शिवसेनेला कमी मते दाखवली होती. त्यामुळे ही जाहिरात दिलेली आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर केले आहे की आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत. तसेच केंद्रात पुन्हा मोदी येणार आणि त्यासाठीच आम्ही कटीबध्द आहोत असेच जाहिरातीमधून सूचित केले जात आहे. त्यामुळे यामध्ये दबावाचा कुठेही भाग नाही, असेही भातखळकर यांनी स्पष्ट केले.