नागपूर : काँग्रेस नेत्यांकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांना लक्ष्य करणे सुरुच आहे. माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या आणि प्रदेश युवर काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांनी यासंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. “बलात्कार हे एक राजकीय हत्यार ते आपल्या विरोधकांच्या विरोधात वापरा, असे सावरकरांचे विचार होते” असा दावा शिवानी वडेट्टीवार यांनी एका जाहीरसभेत (Congress Leader again targets Savarkar) बोलताना केला. काँग्रेस नेत्याकडून आलेल्या या वक्तव्यामुळे आता ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे लक्ष लागले आहे. उद्या रविवारी नागपुरात महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून पुन्हा सावरकरविरोधी वाद उकरून काढण्यात येत असल्याचे दिसत आहे.
जाहीरसभेत विधान
चंद्रपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना शिवानी वडेट्टीवार यांनी हे विधान केलं आहे. दरम्यान, हा विषय फार गंभीर आहे, असे मला वाटत नसल्याची प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली. सावरकराच्या एका पुस्तकातील हा संदर्भ असल्याचे शिवनीने आपल्याला सांगितल्याचे वडेट्टीवार म्हणाले. ती पुस्तकाचा आधार घेऊन बोलली असेल, तर त्यावर वाद होण्याचं काही कारण नाही. पण मला माहिती नाही की ती कोणत्या संदर्भात बोलली आहे. ती स्वत: वकील आहे. त्यामुळे तिला वाचनाचाही मोठा छंद आहे. कुठल्यातरी पुस्तकाचा तिने संदर्भ घेतला व ते तिचे तिचे मत आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेस नेत्याच्या या वादग्रस्त वक्तव्यावर अद्याप ठाकरे गटाकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.