‘मराठी सद्यस्थिती व ज्ञानभाषा दिशा’ विषयक परिसंवाद

0

नागपूर (Nagpur) : 13 जानेवारी
मराठी आपली मातृभाषा आहे, त्यामुळे आपण तिचे चाहते आहोत. ती समृद्ध आहे, पण तिची अभिवृद्धी करुन ज्ञानभाषेत परिवर्तीत करावयाची असल्यास सर्व घटकांचा अंतर्भाव करीत ती रोजगाराभिमुख आणि कालसुसंगत होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन रातुम नागपूर विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी केले.
नूतन भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलन स्थानिक सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आले. संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी दुसर्‍या सत्रात ‘मराठी सद्यस्थिती व ज्ञानभाषा दिशा’ विषयक परिसंवाद आयोजित करण्यात आला. परिसंवादाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते. यावेळी वक्ते म्हणून विदर्भ संशोधन मंडळाचे सचिव डॉ. राजेंद्र वाटाणे, आ. अ‍ॅड. अभिजित वंजारी, मराठी विषय शिक्षक महासंघाचे सचिव प्रा. सुनील डिसले, मराठी अभ्यास मंडळ पुणे येथील सदस्य डॉ. पांडुरंग कंद तर मुलाखतकार वृषाली देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होते.
यासंदर्भात बोलताना डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी, मराठी ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी 19 व्या शतकापासून काम सुरू आहे. त्यात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, लोकमान्य टिळक, आगरकर, न्या. रानडे यांचे मोठे योगदान आहे, त्यांनी विश्वकोश आणि त्याचे खंड तयार करुन हे काम केले. स्वा. सावरकर यांनी देखील इंग्रजीला अनेक पर्यायी शब्द दिले आज ते वापरात आहेत. त्यामुळे ही भाषा समृद्ध आहेच, पण आता काळानुरुप त्यात वैद्यकीय, विधी आणि अभियांत्रिकी या विद्याशाखांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम नव्याने तयार करावा लागेल. त्यातून भाषेला लोकाश्रय मिळेल आणि लोकाश्रयाच्या दबावातून राजाश्रय प्राप्त होईल व त्यानंतर ती ज्ञानभाषा या संज्ञेत बसेल त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील प्रयत्न करावे लागतील असा हितोपदेश देखील दिला.
यावेळी मतप्रदर्शन करताना आ. अभिजित वंजारी यांनी, मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न व्हावे, ग्रंथालयांमध्ये शासनाने लक्ष घालावे, तसेच सीबीएसई, आरसीएसई आदी अभ्यासक्रमांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात मराठी अनिवार्य करावी लागेल, असे सांगितले.
डॉ. पांडुरंग कंद यांनी, मराठी माणसाला त्याच भाषेत स्वप्न पडतात, मात्र अंमलात आणताना इतर भाषांचा त्यावर प्रभाव पडू नये याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबात देखील मराठी संवाद व्हावा, इतर तांत्रिक अभ्यासक्रम मराठीतून यावे आदी उपाय करावे लागतील असे सांगितले.
डॉ. राजेंद्र वाटाणे यांनी, आधुनिक काळात व्हॉट्सअ‍ॅप, युट्युब, इन्स्ट्राग्राम आदींमुळे तसेच इंटरनेटच्या वापराने मराठी भाषा प्रदुषित झाली आहे. त्याठिकाणी मराठी ग्रंथसंपदा प्रभावीपणे त्याठिकाणी प्रतिष्ठापित करावी लागेल, घरातील भाषा व संवाद केवळ मराठीतून होणे अपेक्षित आहे. त्यातून मुलांना बालपणापासून मराठीचे ज्ञान अवगत होईल असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना प्रा. सुनील डिसले यांनी, भाषा हा आचार-विचारांशी संबंधित विषय आहे. मराठी ही 11 कोटी माणसांची व देशातील चौथी महत्त्वाची भाषा आहे. जागतिकीकरणामुळे प्रादेशिक भाषांवर परिणाम झाला तसा तो मराठीवर देखील झाला. त्यामुळे आगामी काळात मराठीला ज्ञान देणारी भाषा म्हणून विकसित करावी लागेल आणि त्यातूनच ती ज्ञानभाषा होण्याचा मार्ग प्रशस्त होईल असे सांगितले. या सत्राचे संचालन डॉ. सुरेश नखाते यांनी केले.