मुंबई MUMBAI – राष्ट्रवादीत फूट पडताच काँग्रेसने NCP तातडीने विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला असल्याने महाविकास आघाडीच्या राजकारणात राष्ट्रवादीची दादागिरी झुगारून वरचढ ठरण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरु झाले असल्याचे मानले जात आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसची सातत्याने छोटा पक्ष म्हणून हेळसांड सुरु होती. आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर काँग्रेसने तातडीने विरोधी पक्ष नेते पदावर दावा मांडत आक्रमक भूमिका घेतली आहे. विपरित परिस्थितीमुळे Sharad Pawar शरद पवारांनीही काँग्रेसचा हा दावा आम्हाला मान्यच असल्याचे सांगत हतबल झाल्याचे संकेत दिले आहेत.
राष्ट्रवादी पक्षात फूट पडतात राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाड यांचे नाव विरोधी पक्ष नेतेपदासाठी पुढे करून खडा टाकून पाहिला. मात्र, राष्ट्रवादीचा हा डाव लक्षात येताच काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार या नेत्यांनी कालच तातडीने विरोधी पक्ष नेते पदावर दावा मांडला आहे. विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय पक्षाकडून नव्हे तर विधिमंडळ अध्यक्षांकडून होत असतो व तो संख्याबळावर ठरतो, याकडे काँग्रेसने लक्ष वेधले. राष्ट्रवादीकडे जास्त आमदार असतील तर त्यांचा विरोधी पक्षनेता होईल, असे सांगत वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादीला टोमणा देखील मारला. तर दुसरीकडे परिस्थिती विपरित असल्याने शरद पवारांनीही काँग्रेसचा हा दावा आम्हाला मान्य असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीसाठी गरज पडल्यास आम्ही कुठलाही त्याग करायला तयार असल्याचे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्यांचे वक्तव्य सध्या राष्ट्रवादीची अगतिकता दर्शवत आहे. पक्षातील फुटीमुळे कमजोर झालेल्या राष्ट्रवादीला कधी नव्हे इतकी महाविकास आघाडीची गरज असल्याचे जाणकारांना वाटते. तर दुसरीकडे राष्ट्रवादीची दादागिरी झुगारून आघाडीतील मोठा भाऊ होण्याचे काँग्रेसचे लक्ष्य राहील, असेही मानले जाते.