धुळे DHULE – भरधाव वेगातील अनियंत्रित कंटेनर थेट एका हॉटेलमध्ये घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात किमान १३ लोक मृत्यूमुखी पडल्याची घटना धुळे जिल्ह्यातील पळासनेर या गावाजवळ घडली आहे. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात झाला असून त्यात सुमारे २० जण जखमी आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिसांकडून व्यक्त होत आहे. (Accident in Dhule District)
प्राथमिक माहितीनुसार, धुळे जिल्ह्यात शिरपुर तालुक्यात मुंबई – आग्रा महामार्गावरील पळासनेर गावाजवळ कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने हा भीषण अपघात झाला. महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर सातपुडा पर्वत रागांच्या जवळ असलेल्या भागात मोठा उतार आहे. या उतारावर मध्य प्रदेशातून महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या या कंटेनरचे ब्रेक फेल झाले होते. त्यानंतर हा कंटेनर थेट पळासनेर गावाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये घुसला.या कंटेनरखाली चिरडल्या गेल्याने ५ जण घटनास्थळीच मृत्यूमुखी पडले तर जखमींपैकी ८ जणांचा मृत्यू रुग्णालयात नेताना किंवा रुग्णालयात झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. हॉटेलला धडक देण्यापूर्वी कंटेनर हॉटेलपुढे असलेल्या इतर वाहनांवर धडकल्याने मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.