Home Artical Blog तत्वांची पुंगळी होते याची सत्यता पटली

तत्वांची पुंगळी होते याची सत्यता पटली

0

 

-पुरुषोत्तम आवारे पाटील

अलीकडे महाराष्ट्रात तत्वनिष्ठ राजकारणाने GANPATRAO DESHMUKH  गणपतराव देशमुख यांच्या सोबतच शेवटचा श्वास घेतल्याची आता सर्वाना खात्री पटली आहे. सत्तेसाठी विविध दिशांना असणारी तोंडे कशी एकाच दिशेने येतात याचा प्रत्यय रविवारी MAHARASHTRA  महाराष्ट्राला आला. ज्याने सत्ताधारी पक्षाच्या चुकांवर अंकुश ठेवत कारभार योग्य पद्धतीने चालावा यासाठी पदाचा वापर करावा त्याच विरोधी पक्षनेत्याने चक्क सत्ताधारी पक्षात सामील व्हावे असे राज्यात चौथ्यांदा घडले आहे. Rane, Vikhe Patil, Shinde राणे,विखे पाटील,शिंदे यांच्यानंतर आता अजित पवार हे त्या रांगेत येऊन बसले आहेत. स्वतःच्या पक्षात अजित पवारांची कोणती घुसमट होती हा स्वतंत्र विषय असला तरी या कोलांटउडीने त्यांचे अंतिम ध्येय सत्ता होते हे या निमित्याने उघडे पडले आहे. जे छगन भुजबळ उठता बसता फुले,शाहू,आंबेडकरांच्या नावाची जपमाळ ओढत असतात त्यांचेही एका रात्रीत भाजपच्या सरकार मध्ये सामील होणे हे मोठे नवल आहे. आपल्या कर्तृत्व कापडांचे गाठोडे घेऊन हे नेते शेवटी BJP भाजपच्या ” वाशिंग मशीन ” पुढे रांगेत उभे झाले आहेत.

अजित पवार Ajit Pawar आणि हे सगळेच नेते संवेदनशील आहेत असा लोकांचा समज होता. रविवारी बुलडाण्यात ज्या भीषण अपघातात २५ लोक बळी गेले त्यांच्या चिंता जळत होत्या त्याच वेळी मुंबईत हे लोक मंत्रिपदाच्या शपथा घेत एकमेकांना पेढे भरवीत होते. चार दिवस हे पुढे ढकलले असते तर आकाश कोसळले नसते मात्र ही बेशरमेची हद्द झाली. तुम्ही ज्यांच्या बळावर राजकीय उद्या मारता टी जनता मरत असताना त्याचेही जर काहीही वाटत नसेल तर यापुढे जनतेच्या ताटात काय वाढून ठेवले आहे हे दिसून आले आहे. सामान्य जनता आणि त्यांच्या वेदना गेल्या उडत ,आम्हाला सत्ता आणि राजकारण यापलीकडे काहीही दिसत नाही हे या नेत्यांनी दाखवून दिले आहे ,किमान अजित पवार याला अपवाद ठरतील ही एकमेव अशाही फोल ठरली आहे. २५ निरपराध लोकांचा आगीत कोळसा झाल्याच्या वृत्ताची शाई वाळण्याच्या आधीच ज्यांना आपले हसरे अन मग्रूर चेहरे लोकांना दाखविण्याची घाई झालेली होती हे लोकांना कळले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात अजित पवार यांनी जी खदखद व्यक्त केली त्यातून त्यांचे पक्षावर किती प्रेम आहे हे दिसले. त्यांना संघटन वाढवायचे आहे आणि पक्षाची आगामी काळात एकहाती सत्ता आणायची आहे याचा निर्धार दिसला , या कार्यात शरद पवार त्यांना बांधून ठेवतात की काय असा आभास निर्माण झाला होता. त्यांच्या रविवारच्या खेळीने मात्र शरद पवार यांचे त्यांच्याबाबत धोरण कसे योग्य होते याचा अनुभव राज्याला आला. शरद पवार माणसे आणि आगामी काळात घडणाऱ्या घटना ओळखण्यात प्रसिद्ध आहेत त्यामुळेच अजित पवारांचे बंड त्यांना मोठा झटका देण्यात कमी पडले. एक वर्षांपासून अजित पवार आणि भाजपची वाढणारी जवळीक कदाचित काकांना माहित असावी ,म्हणून त्यांनी बांधबंदिस्ती करून ठेवली होती याचे आता आकलन होते. कालच्या पत्रकार परिषदेत चेहऱ्यावर कोणताही तणाव येऊ न देता त्यांनी पुन्हा पायाला भिंगरी लावून घेतली यावरून त्यांची दूरदृष्टी अधोरेखित झाली.

आधी शिवसेना फुटल्यावर आता राष्ट्रवादी फुटली आहे , पुन्हा काहीकाळ विधिमंडळात कोणाचा पक्ष खरा याचे प्रयोग काही काळ चालतील आणि शेवटी अजित पवार आणि त्यांच्या सहकार्यांना स्वतःची नवी व्यवस्था निर्माण करून लोकांच्या दारात कौल मागण्यासाठी जावे लागेल. मतदार आणि सामान्य माणूस अतिशय चोखंदळ असतो हे अनेकदा सिद्ध झाले आहे. लोकांना असे जादूचे प्रयोग सहन होत नाहीत. तत्वांची पायमल्ली करणे किंवा असे भ्रष्ट राजकारण त्यांच्या लक्षात येत नाही म्हणून लोक गर्वाने फुगलेल्या छातीवर मतांची टाचणी लावतात आणि अनेकांना ताळ्यावर आणतात हे आजवर आपण अनुभवले आहे. त्यासाठी घोडा मैदान दूर नाही. चिन्ह,पक्ष कोणाला आणि खरा नेता कोण ? याचा निकाल मतदार लावणार आहेतच तोवर कुणीही खटपटी करून घ्यायला हरकत नाही. जुनी खोडे पडल्याशिवाय नवी पालवी फुटत नसते हे दिसून येईल.

राजकारणात तत्व किंवा चांगुलपणा हा केवळ सुभाषित म्हणून वापरायचा असतो त्याला प्रत्यक्ष जीवनात अमलात आणायचे नसते हे या निमित्याने खरे ठरले आहे. सत्ता आणि त्यातून अमाप पैसा या ध्येयाला सध्या कुणीही नाकारू शकत नाही ,करणी आणि कथनी यांच्यात सुरक्षित अंतर ठेवून ज्यांचे राजकारण चालत असते त्या लोकांनी तत्वांची पिळदार पुंगळी केली आहे. प्रीती संगमवरून पवारांचा जनसंपर्क आता सुरु झाला आहे , त्याचे आता जनसागरात कसे रूपांतर होते यावरच यापुढे राजकारण अवलंबून आहे आणि पवार होत्याचे नव्हते करण्यात प्रवीण आहेत यावर विश्वास ठेवला तर हे बंड कसे औटघटकेचे आहे याचाही अनुभव लवकरच महाराष्ट्राला येईल याची खात्री वाटते. राज्यात यापुढे मात्र मोठी चुरस वाढली आहे त्यातून असंख्य नव्या तरुणांना संधी मिळेल , त्यांच्यासाठी ही आपत्ती इष्ट ठरणार आहे हे नक्की.