नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विधान भवनावर मोर्चा काढला जाणार आहे. हा मोर्चा एक लाखाचा राहणार असून त्याचे नेतृत्व स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी (Sharad Pawar to lead NCP Morcha on Assembly Session) दिली आहे. या मोर्चासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे प्रश्न, पीकविम्याचा मुद्दा, गगनाला भिडलेली महागाई आणि राज्यपालांची सततची वादग्रस्त विधाने या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशनात आक्रमक होऊन शिंदे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरला नागपुरात सुरु होणार आहे.
कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षांपासून हिवाळी अधिवेशन मुंबईतच होत आहे. मात्र, यंदाचे हिवाळी अधिवेशन हे नागपुरातच घेण्यात येत आहे. मात्र, राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता अधिवेशन वादळी ठरेल, असे संकेत मिळत आहेत. चार महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले. पण, त्यामुळे राजकीय पक्षांमधील कटुता वाढली आहे. अशातच ओला दुष्काळ, पीक विम्याचा प्रश्न, महागाई, राज्यपालांची विधाने असे अनेक मुद्दे विरोधकांच्या हाती लागलेले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेऊन अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाच्या माध्यमातून शिंदे सरकारला घेरण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. हा मोर्चा महाविकास आघाडीकडून एकत्रितपणे काढण्यात येणार नसला तरी आघाडीचा पाठिंबा या मोर्चाला राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.