मुंबईः “मी राष्ट्रवादीतच राहणार, अॅफिडेव्हीट देऊ का?” या शब्दात आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणारे राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी ठाकरे गटाचे खासदार व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना चांगलेच (Ajit Pawar on Sanjay Raut) झापले. “पक्षाबाहेरचे आणि बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते ते आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखेच चाललेय. त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणास ठावूक? पक्षाची बैठक ज्यावेळी होईल, त्यावेळी मी विचारणार आहे. तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात, त्या पक्षाचे सांगा ना, काय सांगायचं ते. तुम्ही ज्या पक्षाचे मुखपत्र आहे, त्याबद्दल बोला. पण, तुम्ही आम्हाला कोट करून… ते असे झाले, तसे झाले… आम्ही आमची स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत”, या शब्दात त्यांनी संजय राऊतांवर संताप व्यक्त केला.
अजित पवार पुढे म्हणाले, “आमचे वकीलपत्र दुसऱ्या कुणी घेण्याचे कारण नाही. त्यांनी त्यांची त्यांची भूमिका मांडावी. आमची भूमिका मांडण्यासाठी आमच्या पक्षाचा प्रवक्ता, आमच्या पक्षाचे नेते मग राष्ट्रीय स्तरावरचे असतील किंवा राज्य स्तरावरील असतील, हे त्याबाबतीत मजबूत आहे”, अशा कडक शब्दात त्यांनी अजित पवारांनी संजय राऊतांना समज दिली.
यावेळी बोलताना अजित पवारांनी उद्धव ठाकरेंचाही उल्लेख केला. “कारण पक्ष नसताना अशा बातम्या आल्या की, आमचे मित्रपक्ष… आता उद्धव ठाकरेंना लोक प्रश्न विचारतात. त्यांनी सांगितलं की मी एकटा लढेन. वास्तविक आम्ही दोघे सोबत आलो, त्यावेळी मी त्यांना सांगितले होते की यात काहीही तथ्य नाही”, असेही अजित पवार म्हणाले.