सुधीर मुनगंटीवार यांची मागणी फळणार!
(Sudhir Mungantiwar – Minister of Finance & Planning, Forests in the Government of Maharashtra)
नागपूर ( Nagpur) महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (forest minister sudhir mungantiwar) यांनी काही दिवसांपूर्वी लिहिलेल्या एका पत्राची दखल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतली असून, नागपूर -हैदराबाद दरम्यान वंदेभारत एक्स्प्रेस चालविण्यासाठीची तयारी आरंभली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयामुळे नागपूर, विदर्भातील नागरिकांची मोठीच सोय होणार आहे. शिवाय केलेल्या प्रयत्नांच्या परिपूर्तीचा आनंद आणि यशाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा असे दुहेरी अनुभव सुधीर मुनगंटीवार यांच्या संदर्भात अधोरेखित होणार आहेत….
नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (Nagpur-Hyderabad Vande Bharata Express Train) सुरु करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे सांस्कृतिक कार्य व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Cultural Affairs Minsiter Sudhir Mungantiwar) यांनी गेल्या वर्षी रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांच्याकडे केली होती. मुनगंटीवार यांच्या या मागणीची दखल घेऊन रेल्वे मंत्रालयाने त्यावर कार्यवाही केली आहे. नागपूर-हैदराबाद वंदे भारत ही ट्रेन लवकरच सुरु होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नागपूरलगतचे क्षेत्र आणि हैदराबाद दरम्यानचा मार्ग हा व्यापारी वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय व्यस्त मानला जातो. त्यामुळे नागपूर-हैदराबाद मार्गावर बऱ्याच प्रवासी रेल्वेगाड्या देखील आहेत. सध्या नागपूर-हैदराबाद मार्गावर २५ रेल्वेगाड्या धावत असल्या तरी या मार्गावर राजधानी आणि शताब्दीसारख्या सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचे मात्र तितकेसे प्रमाण नाही.
नागपूर आणि हैदराबाद अंतर ५८१ किलो मीटरचे असून यासाठी सध्याच्या गाड्या सरासरी दहा तासांचा अवधी घेतात. मात्र, आता सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने सुरु होत असलेल्या नव्या नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमुळे प्रवासाचा हा कालावधी १० वरून ६ तास ३० मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या विदर्भातील जिल्ह्यांना नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची प्रतीक्षा होतीच. ही ट्रेन सुरु होत असल्याने त्याचा लाभ या चारही जिल्ह्यांतील व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात होणार आहे.
या रेल्वेगाडीचे थांबे कसे व किती राहणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन नागपूर आणि हैदराबाद दरम्यानच्या बल्लारशा, सिरपूर कागजनगर, रामगुंडम आणि काझीपेठ या स्थानकांवर थांबणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही गाडी सकाळी ६ वाजता नागपुरातून सुटणार असून ती दुपारी साडेबारा वाजता हैदराबादला पोहोचणार आहे. हैद्रराबाद स्थानकावर एक तास थांबल्यावर तीच गाडी दुपारी दीड वाजता हैदराबाद येथून निघून रात्री ८ वाजता नागपुरात परतणार आहे. ट्रेनची कमाल वेग मर्यादा ताशी १३० किलो मीटर एवढी राहणार आहे. या ट्रेनचे तिकीटभाडे अद्याप जाहीर झालेेले नाही. मात्र, सूत्रांच्या मते एसी चेअर कार वर्गासाठी १५१५ रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी २८३५ रुपये आकारले जाण्याची शक्यता आहे.