

महिलांकडून पुरुषांना बसतो कापूस फेकीचा मार!
चिखली (Chikhli) :-
सुंदर देशा, पवित्र देशा याबरोबरच विविध परंपरांनी समृद्ध देशा आणि सुंदर कलांच्या देखण्या देशा असेही महाराष्ट्राचे वर्णन करायला हवे. जे जे उत्कट, उदात्त, उन्नत ते ते सर्वत्र इये देशी पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. महाराष्ट्रात पारंपारिक पद्धतीने आणि जुन्या परंपरेनुसार उत्सव साजरे होतात. आपला महाराष्ट्र वर्षांनुवर्षे चालत आलेल्या असंख्य रूढी-परंपरा, त्यांचे विविध रूपाने केले गेलेले सादरीकरण, नाटय़, संगीत, विविध कला अशा असंख्य असंख्य रूपाने नटलेला आहे, समृद्ध आहे. या सगळ्या गोष्टींना परंपरांचा अप्रत्यक्ष वारसा अथवा अमूर्त वारसा असे म्हणता येईल गावोगावी भरणाऱ्या जत्रा-यात्रा आणि त्यामध्ये सादर होणाऱ्या काही वैशिष्टय़पूर्ण कला पाहिल्या की निव्वळ आश्चर्य वाटते. चिखली तालुक्यातील भानखेड येथे देखील आदिवासी कोळी समाजाची अशीच आगळी वेगळी परंपरा जोपासली आहे.
येणाऱ्या काळात पुरुषांवर अनिष्ठ येऊ नये, यासाठी महिलांकडून रुईच्या झाडाच्या हिरव्या फोक्यांचा मार देण्याची प्रथा धुलिवंदनाच्या दिवशी केली जाते . त्यामुळे येथील होळी आणि धुळवड चे एक वेगळेच आकर्षण असते. चिखली तालुक्यातील भानखेड येथे आदिवासी कोळी समाज आहे. इतर ठिकाणी आदीवासी पंरपरा लोप पावत असल्या तरी भानखेड वासीयांनी मात्र जुन्या पंरपरा कायम ठेवली आहे. होळीच्या दिवशी गावात गौवऱ्या जमा करुन सामूहिक होळी पेटविली जाते. त्यानंतर धुळवडीच्या दिवशी सरपंच, पोलीस पाटील व ज्येष्ठ मंडळी रक्षा घेऊन गावातील हुनमान मंदिरासमोर पोहचतात.
तत्पूर्वी गावातील वेशी पासून पोलीस पाटील, सरपंच आणि गावकरी घरोघर जाऊन फगवा मागतात. प्रत्येक कुटुंब दहा रुपये आणि गहु व ज्वारी असे धान्य देतात. होळीची राख घेऊन हनुमान मंदिरा समोर पोहचल्यावर मंदिरसमोर एक ८० किलो वजनाची दगडाचा गोळा ठेवला जातो त्याला गुंड असे म्हणतात. या गुंडची पूजा केल्यानंतर गावातील तरुण मंडळी तो उचलून मंदिराला प्रदक्षिणा घालतात. शेवटी पोलीस पाटील, सरपंच ज्येष्ठ नागरिक ह्या गुंडला एक एक बोट लावून उचलून मानमोळा करतात. त्यानंतर गावातील वेशीमध्ये फगवा मागून जमा झालेली रक्कम व धान्य ज्या खुटाकडे त्यादिवशी चा मान आहे त्या खुटातील महिलांकडे सुपूर्द केले जाते.
तोपर्यत गावातील वाजंत्री जंगलातुन रुईच्या फोक्या तोडून आणतात आणि महिलांना देतात. ह्या फोक्या घेऊन महिला रस्त्यावर दुतर्फा उभ्या रहातात त्यांच्या मधुन पुरुष मंडळी जातात तेव्हा ह्या महिला त्यांना फोक्या मारतात. ह्या फोक्याचे फटके बसल्यावर इडा पिडा टळते, आरोग्य चांगले राहते, अशी श्रद्धा आहे. फगवा मागूण मिळालेल्या रकमेतून महिला गावातील मरीमातेला पातळ चढवितात आणि अन्न, धान्यातून गावात प्रसादाचे वाटप केले जाते. अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने जुन्या पंरपरेनुसार येथे होळी आणि धुळवड साजरी करण्याची प्रथा आजही कायम आहे. या संपूर्ण कार्यक्रमासाठी गावकरी सहकार्य करतात.