चिखलदरा. अलिकडेच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीने अनेक प्रस्थापितांना धक्के दिले. अनेक नात्यांना गोत्यात आणले. परंतु, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील आकी गटग्रामपंचायतीमध्ये (Aki Gatgram Panchayat of Chikhaldara Taluka of Amravati District ) थेट निवडणूक असलेल्या सरपंचासह सदस्यांच्या सात जागांवर एकाच कुटुंबातील व्यक्ती (Seven seats of members including Sarpanch are held by persons from the same family) निवडून आल्याचा विक्रमच घडला आहे. चिखलदरा पंचायत समितीअंतर्गत आकी व चौऱ्यामल या दोन गावांसाठी ग्रामपंचायत आहे. १,२०५ लोकसंख्या असलेल्या या दोन्ही गावांमध्ये ६०० हून अधिक मतदार आहेत. नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक आटोपली. या ग्रामपंचायतीमध्ये सात ग्रामपंचायत सदस्य व सरपंच अशा आठ जागांवर जावरकर कुटुंबातील पाच सदस्य निवडून आले. दोन जागांवर दोन सदस्य निवडून आल्याने शुक्रवारी त्यांनी नियमानुसार राजीनामा दिला. माजी पोलिस पाटील बाबू जावरकर यांचे कुटुंब या विजयाने चर्चेत आले आहे.
हे आहेत ग्रामपंचायत सदस्य
सरपंचपदावर सून इंद्रायणी राजेश जावरकर, सदस्यपदासाठी मुलगा माजी सरपंच राजेश जावरकर, पत्नी रुखमा बाबू जावरकर, बहीण बांदाय मावसकर, भाचा रामलाल जांभेकर, नात मीना सेलेकर हे सात जागांवर पाच सदस्य निवडून आले आहेत.
दोन वॉर्डांतून विजय अन् राजीनामा
जावरकर कुटुंबाने सात सदस्यपदांच्या जागेसाठी पाच सदस्य उभे केले होते. मुलगा राजेश जावरकर व नात मीना सेलेकर हे सदस्य दोन जागांवरून निवडून आल्याने प्रत्येकी एका जागेचा राजीनामा त्यांनी शुक्रवारी तहसील कार्यालयात दिला. रिक्त जागेवर नियमाने सहा महिन्यांच्या आत निवडणूक लागेल.
पंधरा वर्षांपासून सरपंच घरातच
मोरगड ग्रामपंचायतीमधून २०१७ साली आकी ग्रामपंचायतीची निर्मिती झाली. प्रथम सरपंच राजेश जावरकर असले तरी मोरगाव ग्रामपंचायतीत उपसरपंच व सरपंचपदावर बाबू जावरकर यांची पत्नी रुखमा जावरकर होत्या. त्यामुळे मागील पंधरा वर्षांपासून पद घरातच आहे. जावरकर कुटुंबाचे गावात वर्चस्व राहिले आहे. लोकांच्या मदतीला धावून जात असल्याने गावकरीही त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असतात. ही परंपरा यंदाही कायम राहिली. लोकसेवेचा वसा घेतलेल्या या कुटुंबाला गावकरी भरभरून मतरूपाने प्रेम देतात. यावेळी कुटुंबाने मिळविलेल्या यशामुळे लोकंही आनंदले आहेत.