
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजीला ऊत आलाय. गेल्या काही दिवसांपासून भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पोस्टर मुंबईतील राष्ट्रवादी ऑफिसच्या बाहेर लावलेले दिसून आले. अशातच आता त्यात खासदार सुप्रिया सुळे यांचीही भर पडलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आता महाराष्ट्रची पहिला महिला भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे असा उल्लेख असलेले होर्डिंग्ज लागले आहेत. राष्ट्रवादीकडून होणाऱ्या बॅनरबाजीची सध्या सातत्याने चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वीच जयंत पाटलांच्या बॅनरची चर्चा होती तर मागील काही दिवसात अजित पवारांच्या होर्डिंग्जची चर्चा सुरु होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर हे होर्डिंग्ज लागले आहेत. यामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजीला ऊत आल्याचे दिसत आहे. अजित पवार यांनी काल या मुद्यावर बोलताना समर्थक कार्यकर्ते असे प्रकार करीत असातात, असे सांगत वेळ मारून नेली. मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ लागले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तर शरद पवार यांनीही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ लागले असते सांगताना या विषयावर अधिक बोलण्याचे टाळले होते. गेल्या काही दिवसांमध्ये दोन वेळा अजित पवार यांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. त्याचबरोबर अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल, असे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी जाहीरपणे सांगितले आहे.