जावेद अख्तर यांच्या वक्तव्याचे भारतात कौतूक, पाकिस्तानी भडकले

0

 मुंबई : प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन (Lyricist Javed Akhtar statement in Pakistan ) मुंबईवरील हल्ला प्रकरणात पाकिस्तानला आरसा दाखविल्याचे भारतात कौतूक होत असतानाच पाकिस्तानात मात्र अनेक सेलीब्रिटी अख्तर यांच्यावर भडकले आहेत. पाकिस्तानात सोशल मिडियावर अख्तर यांच्यावर टिका होत आहे. तर अख्तर यांचे समर्थन करणारा पाकिस्तानी गायक अली जफर याच्यावर टीका होत आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनीही अख्तर यांचे कौतूक करताना भाजपवर टीका करण्याची संधी मात्र सोडली नाही. सर्जिकल स्ट्राईक झाल्यावर पाकिस्तान नष्ट झाल्याच्या आविर्भावात भाजपच्या लोकांनी फटाके फोडले. मात्र, जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन त्यांची जी धूलाई केली, त्याला हिंमत लागते. त्यामुळे देशातील सर्व राजकीय पक्षांनी जावेद यांच्या धाडसाला दाद दिली पाहिजे, असेही ते म्हणाले.

पाकिस्तानमध्ये आयोजित फैज फेस्टिव्हलमध्ये जावेद अख्तर यांनी हजेरी लावली होती. यावेळी अख्तर यांनी पाकिस्तानातील लोकांना आरसा दाखविला. मुंबईवर हल्ला करणारे लोक काही नॉर्वे, इजिप्तमधून आलेले नव्हते तर ते पाकिस्तानातून आले होते व ते आजही मोकाट आहेत, या शब्दात पाकिस्तानातील लोकांना सुनावले. त्यांच्या वक्तव्याचे भारतात कौतूक होत आहे तर पाकिस्तानात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यांच्या भाषणाचे कौतुक करणाऱ्या पाकिस्तानी प्रेक्षकांना आता लक्ष्य केले जात आहे. अनेक प्रेक्षकांनी अख्तर यांच्या वक्तव्यावर टाळ्याही वाजविल्या होत्या. मात्र, अख्तर यांच्या विधानावर पाकिस्तानातील सेलिब्रिटी मात्र चांगलेच खवळले आहेत. अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटींनी जावेद अख्तर यांच्यावर टीका केली आहे. अभिनेत्री सबूर अलीने अख्तर यांनी आमच्याच मातीवर आमचा अवमान केल्याची टीका केली आहे. तर जावेद अख्तर हे गुजरात दंगलीवर मौन बाळगून असल्याचा कांगावा अभिनेता शान शाहीनने केलाय. दरम्यान, भारतात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांनी जावेद अख्तर यांचं अभिनंदन करावे, अशी मागणी केली आहे. भाजपने अख्तर यांच्यावर नेहमी टीका केली आहे. त्यांना पाकिस्तानमध्ये जा, असा इशारा दिला. मात्र पाकिस्तानमध्ये जाऊन टीका करणे याला या ५६ इंचाची छाती लागते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.