नितीन देसाईंच्या आत्महत्येमागील रहस्य लवकरच उलगडणार

0

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई Nitin Desai is a famous art director in Bollywood यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना त्यांच्या आत्महत्येपूर्वीच्या काही ऑडिओ क्लिप्स मिळाल्या असून त्यात कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या चार ते पाच जणांची नावे असल्याची माहिती पुढे आली आहे. रायगड पोलिसांना नितीन देसाई यांच्या फोनमधून अकरा ऑडिओ क्लिप मिळाल्या आहेत, ज्यातून या प्रकरणाच्या तपासाला योग्य दिशा मिळणार असल्याचे मानले जात आहे. ऑडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती आहे. ज्या चार जणांची नावे पुढे आली आहेत, त्यात एका अभिनेत्याचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ऑडिओ क्लिपमध्ये नितीन देसाईंच्या एनडी स्टुडिओवर बहिष्कार टाकण्यात आल्याचा प्रकार लक्षात आलाय. बॉलीवूडमधील एका मोठ्या गटाने हा बहिष्कार घातल्याची माहिती मिळत असून या गटात अनेक कलाकारांची नावेही समोर आली आहेत. मात्र, या क्लिपसोबत काही छेडछाड करण्यात आली आहे का, याची सध्या फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. कर्ज आणि खराब आर्थिक परिस्थिती यामुळे त्यांनी आत्महत्या केली अशा चर्चा होत्या. मात्र आता या ऑडिओ क्लिपमुळे अनेक धक्कादायक आणि नवे खुलासे झाले असून नितीन देसाई हे लॉबिंगचे बळी ठरल्याचे बोलले जात आहे.

माझ्याकडे धक्कादायक माहिती-आशीष शेलार

या प्रकरणात महत्वाची व धक्कादायक माहिती माझ्याकडे असून त्याचा योग्यवेळी खुलासा करणार असल्याचे भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष व आमदार आशीष शेलार यांनी म्हटले आहे. त्यामुळे शेलार यांचा इशारा नेमका कोणावर आहे, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

आज अंत्यसंस्कार

दरम्यान, आज सकाळी नितीन देसाई यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी एनडी स्टुडिओमध्ये ठेवण्यात आला आहे. आज दुपारी ४ वाजता त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे. कर्जत येथील एन.डी स्टुडिओत हे अंत्यसंस्कार पार पडतील, अशी माहिती आहे.