Home MAHARASHTRA पार्थ बोस यांचे सितारवादन आणि देवकी पंडित यांच्या गायनाने ‘सप्तक’ महोत्सवाचा रंगतदार...

पार्थ बोस यांचे सितारवादन आणि देवकी पंडित यांच्या गायनाने ‘सप्तक’ महोत्सवाचा रंगतदार समारोप

0

नागपूर, १५ मार्च :

पंडित पार्थ बोस यांच्या प्रभावी सितारवादनाने व
हिंदुस्तानी शास्त्रीय तसेच सुगम संगीतातील लोकप्रिय गायिका देवकी पंडित यांच्या सुरेल गायनाने ‘सप्तक’ च्या दोन दिवसीय संगीत
महोत्सवाचा रंगतदार समारोप झाला.

‘सप्तक नागपूर’तर्फे सुप्रसिद्ध संगीतकार अन्नपूर्णा देवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच मोरेश्वर माधव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित द्विदिवसीय संगीत महोत्सवाचे पर्सिस्टंट सिस्टीम्सच्या कवी कुलगुरू कालिदास सभागृहात आयोजन करण्यात आले होते.

महोत्सवाच्या आज दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात पंडित पार्थ बोस यांच्या प्रभावी सितारवादनाने झाली. यावेळी बोलताना पंडित बोस यांनी अन्नपूर्णा देवी या भारतीय शास्त्रीय संगीतातील दिग्गज सुरबहार (बास सितार) वादक असल्याचे सांगितले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या महोत्सवात वादन करण्याचा आनंद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी वसंतराव देशपांडे महोत्सवानिमित्त नागपुरात आलो होतो, असे सांगत त्यांनी येथिल लोकांची संगीताबद्दलची रसिकांची अभिरुची विशेष असल्याचेही नमूद केले.

यानंतर त्यांनी मैयर घराण्याच्या शैलीत अत्यंत गंभीर, प्राचीन व सायंकालीन संधिप्रकाश राग मानल्या जाणाऱ्या राग श्रीचे भावपूर्ण आणि मींडप्रधान सादरीकरण केले. पुढे राग मधुवंतीमध्ये विलंबित तीनताल आणि एकतालातील बंदिश तसेच राग मिश्र पिलूतील बंदिश सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबल्यावर परिमल चक्रवर्ती यांनी समर्थ साथ दिली. ‘सप्तक’चे डॉ. उदय गुप्ते यांनी कलाकारांचे स्वागत केले.

यानंतर हिंदुस्तानी शास्त्रीय तसेच सुगम संगीतातील लोकप्रिय गायिका देवकी पंडित यांचे गायन झाले. त्यांनी राग रागेश्री मध्ये निबद्ध लागी रे जब से शाम से ही बंदिश सादर केली. त्यांना संवादिनीवर अभिनय रवंदे, तबल्यावर स्वप्नील भिसे तर तानपुर्यावर मीरा निलाखे यांनी साथ दिली. कलाकारांचे स्वागत विवेक देशपांडे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी मोडक यांनी केले, तर मुक्ता पुराणिक यांनी आभार मानले. कार्यक्रमाला निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, स्पेसवुडचे विवेक देशपांडे व कुटुंबीय तसेच संगीत क्षेत्रातील मान्यवर आणि संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रदीप मुंशी, नितीन सहस्रबुद्धे, निनाद मानेकर, उदय पाटणकर आणि विकास लिमये यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी स्पेसवुड, बैद्यनाथ आणि पर्सिस्टंट सिस्टीम्स यांचे सहकार्य मिळाले.